मागील साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांवर आत्तापर्यंत २८० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, परराष्ट्र राज्यमंत्री वी. के. सिंह यांना संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचार वर्षात ८४ वेळा परदेशवारी केल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

ज्याही वेळी पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत त्यावेळी सर्वाधिक खर्च हा एअर इंडिया वनच्या सुरक्षित हॉटलाइन आणि इतर व्यवस्थेसाठी झाला आहे. याशिवाय जे पैसे खर्च करण्यात आले आहेत त्यात अनेक बाबींचा समावेश आहे मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ते उघड करता येणे शक्य नाही.

मे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी जपानचा दौरा केला. हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा पहिला दौरा होता. त्यानंतर अमेरिकेलाही ते काही वेळा गेले. तिथे जाऊन त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. तसेच त्यांनी चीनचाही दौरा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांनी पहिल्यापासूनच निशाणा साधला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतरही ते जपानला गेले होते. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करत असतानाच विरोधकांनी पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यावरही टीका केली. लोकांकडे पैसे नसताना पंतप्रधान परदेश दौरा कसा काय करू शकतात असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता.

जुलै २०१७ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६ खंडांमध्ये ३१ वेळा परदेश दौरा केला. अमेरिकेच्या दौऱ्यासह त्यांनी एकूण ४९ देशांचा दौरा केला. सुरुवातीला त्यांनी आशियाई देशांचा दौरा केला., त्यानंतर ते दक्षिण पूर्व भागात गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवेळा अमेरिका दौरा केला. तर फ्रान्स, रशिया आणि जर्मनी या देशांना तीन वेळा भेटी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील तीन वर्षांमध्ये ३.४ लाख किमीचा प्रवास केला आहे. २६ मे २०१४ पासून आत्तापर्यंतच्या खर्चाचा विचार केला तर २ हजार कोटींचा खर्च झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा वारी सर्वात जास्त खर्चिक होती. या दौऱ्यासाठी ३१.२ कोटी रुपये खर्च झाले होते. ९ ते १७ एप्रिल या कालावधीत त्यांनी या देशांना भेटी दिल्या होत्या.