नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा साफ होणार आहे. त्यामुळेच नोटाबंदीचा कठोर निर्णय घ्यावा लागला अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. एकीकडे काँग्रेस म्हणते की राजकीय फायद्यासाठी नोटांबदीचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे तेच म्हणतात की सर्वसामान्य या निर्णयावर नाराज आहेत. पण हे दोन्ही एकत्र कसे होऊ शकते असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला आहे.

नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारताची आता ऐतिहासिक वाटचाल सुरु आहे. विकसित राष्ट्र आणि जागतिक नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत हा देश आहे. एक असा भारत जो सर्वप्रकारच्या ‘घाणी’पासून मुक्त आहे असे त्यांनी सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर वारंवार बदलणा-या निर्णयांवरही मोदींनी स्पष्टीकरण दिले. मोदी म्हणाले, तुमचे धोरण आणि रणनिती वेगळी असली पाहिजे. नोटाबंदीचा निर्णय हे आमचे धोरण दर्शवतो. तर रणनिती ही वेगळीच असली पाहिजे. आपण शत्रूपेक्षा एक पाऊल पुढे असले पाहिजे असे सांगत त्यांनी ‘तू डाल डाल, मै पात पात’ या हिंदी म्हणीचा दाखलाच दिला. जर तुमचे उद्दीष्ट प्रामाणिक आणि पारदर्शक आहे तर त्याचे परिणाम सर्वांनाच दिसतील. माझे विरोधक काहीही म्हणो, पण हा निर्णय व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हे तर जनहितासाठीच घेतला असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी आयकर विभागाला अंधारात बाण मारावे लागत होते. पण आता लोक स्वतःहून समोर येऊन बँकेत पैसे जमा करत आहे. प्रामाणिक करदात्यांना त्रास होऊ नये आणि करबुडव्यांना शिक्षा व्हावी हेच आमचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आता पैसा जेव्हा बँकेत परतेल तेव्हा तो बेनामी राहणार नाही. ज्या काळा पैशाचा कधी थांगपत्ताच नव्हता आता तो बाहेर येईल. काळा पैसाधारक दुस-यांच्या बँक खात्यात पैसे जमा करुन लपण्याचा प्रयत्न करतील. पण ते काही काळच लपू शकतील. सरकारकडे या सर्वांचा शोध घेणारी यंत्रणा तयार आहे असा इशाराच त्यांनी दिला.

दहशतवादी, नक्षलवादी आणि अन्य कट्टरतावादी गटांची आर्थिक कोंडी झाली आहे. याशिवाय अंमली पदार्थांची आणि मानवी तस्करी करणा-यांवर यामुळे लगाम बसला असे त्यांनी सांगितले. नोटाबंदीचा निर्णय हा तात्पुरता नव्हे तर दिर्घकालिन फायदे बघूनच घेतला असा दावाही त्यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनातील गोंधळावर मोदी म्हणाले, आम्ही संसदेतील कामकाज सुरु राहावे यासाठी प्रयत्न केले. अर्थमंत्र्यांनीही चर्चेची तयारी दर्शवली, मीदेखील संसदेतील कामकाजात सहभागी होण्यास तयार होतो. पण काँग्रेसने चर्चेऐवजी गोंधळ घातला असा आरोप त्यांनी केला.