भारतात लवकरच करोना लसीकरण सुरू होत आहे. आम्हाला देशातील वैज्ञानिकांचा अभिमान आहे. नव्या वर्षात भारतात दोन लसींना परवानगी मिळाली, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानावर जोर दिला. राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना मोदींनी वस्तू व सेवांच्या गुणवत्तेवर भर देण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रीय हवामान परिषदेबरोबरच पंतप्रधानांनी राष्ट्रीय पर्यावरणीय गुणवत्ता प्रयोगशाळेचं भूमिपूजन केलं. यावेळी मोदींनी व्होकल फॉर लोकलचा नारा देत भारतीय वस्तू जगातील बाजारापर्यंत नेण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत पंतप्रधानांनी नवे परिमाण निश्चित करण्याचं आवाहन केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले,”दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, देशात लवकरच करोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. देशातील सेवा गुणवत्तापूर्ण असायला हव्यात. मग ते क्षेत्र सरकारी असो वा खासगी. वस्तू दर्जेदार हव्यात. आपली गुणवत्ता परिमाण हे निश्चित करणार आहे की, भारतीय बनावटीच्या वस्तूंची जगात किती मागणी वाढली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात भारत आज जगाचं नेतृत्व करण्याच्या दिशेनं जात आहे. पण, हवेची गुणवत्ता आणि कार्बन उत्सर्जन मोजण्याच्या साधनांसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे. यातही आत्मनिर्भर होण्यासाठी आपणं मोठं पाऊल टाकलं आहे,” असं मोदी म्हणाले.

आणखी वाचा- अदर पुनावाला यांनी जाहीर केली करोना लसीची किंमत; म्हणाले…

“२०२० मध्ये देस स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत आहे. २०४७मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठीचे संकल्प लक्षात घेऊन पुढे जावं लागणार आहे. त्यासाठी नवीन उद्दिष्ट, नवीन परिमाणं, नवी उंची गाठण्याच्या दिशेने पावलं टाकावी लागणार आहेत. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी संवाद करावा. करोना काळातील आपले अनुभव आणि नव्या शोधाबद्दलची माहिती नव्या पिढीला सांगावी. त्यातून भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवण्यास मदत होईल,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.