“जगाला चांगल्या भविष्याची गरज आहे हे आपण सर्वजण मान्य करतो. आपल्या सर्वांनाच एकत्रितरित्या भविष्याला आकार द्यायचा आहे. भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन मुख्यत: अधिक मनुष्य-केंद्रित असणे आवश्यक आहे,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. अमेरिका भारत बिझिनेस कौन्सिलच्या इंडिया आयडिया समिटमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. भारतात अनेक संधी उपलब्ध असून अमेरिकन कंपन्यांसाठी गुंवणुकीचे पर्यायही उपलब्ध असल्याचं ते म्हणाले.

“आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही समृद्ध भारत आणि जगासाठी योगदान देत आहोत. त्यासाठी आम्ही तुमच्या भागीदारीची प्रतीक्षा करत आहोत,” असंही मोदी यावेळी म्हणाले. “आपल्याला देशांतर्गत उत्पादनाची क्षमता वाढवण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त आर्थिक संस्थांनाही बळकट करण्याची गरज आहे. आज संपूर्ण जग हे भारताकडे पाहत आहे. भारतात संधी आणि तंत्रणाचा ताळमेळ आहे,” असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या सहा वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था अधिक मुक्त करण्यासाठी तसंच अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी आहे. भारत तुम्हाला ­आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीत, तसंच आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करत आहे. भारत सध्या स्वत:ला गॅस बेस्ड अर्थव्यवस्थेत बदलत आहे. ऊर्जा क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. क्लीन एनर्जीच्या क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी संधी उपलब्ध आहेत,” असं मोदी म्हणाले. “भारतात आतापर्यंतचं सर्वात मोठं पायाभूत सुविधांचं काम सुरू आहे. या क्षेत्रासह एव्हिएशन क्षेत्रातही भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होतील. या क्षेत्रातही गुंतवणुकीचा विचार केला जावा,” असं त्यांनी नमूद केलं.

विमा क्षेत्रात १०० एफडीआय

भारतानं विमा क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. तसंच संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीचं कॅप वाढवून ते ७४ टक्के करण्यात आलं आहे. तसंच आम्ही अंतराळ संशोधन क्षेत्रातही मोठ्या सुधारणा करत आहोत. या क्षेत्रातही गुतवणुकीचं स्वागत केलं जाणार असल्याचही मोदींनी स्पष्ट केलं.

मैत्रीची नवी उंची गाठली

भारत आणि अमेरिकेनं मैत्रीची एक नवी उंची गाठली आहे. आता आमची भागीदारी जगला या महामारीतून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

भारताचं मोठं सहकार्य – केनेथ जस्टर

“भारतानं जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांना औषधं उपलब्ध करून दिली आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य उत्तम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेकदा संभाषण झालं आहे. आम्ही खरोखरच एका सामरिक भागीदारीचे सर्वसमावेशक जागतिक रणनीतिक भागीदारीत रूपांतर केले आहे आणि पंतप्रधानांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही देशांमधील २१ व्या शतकातील हे सर्वात महत्त्वपूर्ण संबंध असू शकतात,” असं मत अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी व्यक्त केलं.

भारत आमचा संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख भागीदार : पॉम्पिओ

“भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील उद्योन्मुख भागीदार आहे,” असं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केलं. तसंच पुढील जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचंही ते यावेळी म्हणाले.