“आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवं लागंल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. करोना व्हायरसच्या संकटादरम्या त्यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात बंगाली भाषेतून केली. “गेले ९५ वर्षे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून देशसेवा केली जात आहे. आज देशाला आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीनं ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्यानं पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असं म्हटलं जात,” असंही त्यांनी नमूद केलं.

“पाच वर्षांनंतर संस्था १०० वर्ष पूर्ण करणार आहे. २०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच आत्मनिर्भर भारत अभियान पूर्ण करण्यासाठी संकल्प करण्याची ही योग्य वेळ आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. पाच वर्षांपूर्वी देशात एक एलईडी बल्ब ३५० रुपयांना मिळत होता. परंतु आता तो ५० रूपयांना मिळतो. आता कोट्यवधी लोक एलईडी बल्बचा वापर करत आहेत. यामुळे उत्पादनाचा खर्च कमी झाला आणि त्याचा फायदाही धाला. तसंच यामुळे वीजेचं बिलही कमी झालं असून पर्यावरणालाही त्याचा फायदा झाल्याचं ते म्हणाले.

… तर नव्या संधी नाही

“आपली संकल्प शक्तीच आपल्याला पुढील मार्ग दाखवत असते. जो पहिल्यांदाच हार पत्करतो त्याच्यासमोर नव्या संधी उपलब्ध होत नागीत. अशातच जिंकण्याचे प्रयत्न करणाराच पुढे जाऊ शकतो आणि त्याला नव्या संधी मिळू शकतात,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. कठिण परिस्थितीत भारत कायम पुढे आला आहे. आज संपूर्ण जग करोनाच्या संकटाशी लढा देत आहे. करोना वॉरियर्ससोबत देश या लढाईतर मागे नाही. हे संकट संधीच्या रूपात बदलायचं असल्याचा संकल्प देशवासीयांच्या मनात आहे. या संकटाला आपल्याला टर्निंग पॉईंट सिद्ध करायचं असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.