नेहरू, इंदिरा आणि राजीव यांचा उल्लेखविशेष

पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या राहुल गांधी यांचे पणजोबा, आजी आणि वडिलांच्या विधानांचाच वापर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत गुरुवारी काँग्रेसची चांगलीच कोंडी तर केलीच, पण पार खिल्लीही उडविली. पंतप्रधांनी नेहमीच्या शैलीत काँग्रेसला लक्ष्य केले असले तरी देशाच्या विकासाकरिता खांद्याला खांदा लावून काम करण्याचे विरोधकांना आवाहन केल्याने २२ महिन्यांनंतर प्रथमच मोदी यांनी एक पाऊल मागे टाकल्याचे मानले जाते.

‘मेक इन इंडिया’ पासून केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर राहुल गांधी यांनी लोकसभेत बुधवारी केलेल्या भाषणात मोदी यांच्यावर हल्ला चढविला होता. सरकारचे वाभाडे काढताना त्यांनी मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर मोदी आपल्या भाषणात तेवढय़ाच तिखटपणे उत्तर देणार हे ओघानेच आले. अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींच्या आभारदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी संसद वारंवार बंद पाडण्याच्या काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्ला चढविला. संसदेचे कामकाज चालावे, चर्चा व्हावी, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली होती. त्याचा उल्लेख करीत मोदी यांनी काँग्रेसवर सारे पलटविले. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेचे महत्त्व अधोरेखित केले होते याची आठवण मोदी यांनी काँग्रेसला करून दिली. संसदचे कामकाज हे गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पाडले पाहिजे, या राजीव गांधी यांच्या विधानांचा खुबीने आधार घेतला. ‘मेक इन इंडिया’ची राहुल यांनी खिल्ली उडविली होती, पण राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी १९७४ मध्ये केलेल्या भाषणाचा उल्लेख करीत काँग्रेसच्या शिडातील हवा काढून घेतली.

संसदेच्या लागोपाठ दोन अधिवेशनांचे कामकाज गोंधळात उरकावे लागल्यानेच काँग्रेसला जाणीव करून देण्याकरिता मोदी यांनी नेहरू, इंदिरा व राजीव यांनी लोकसभेचे कामकाज चालावे म्हणून केलेली विधाने संसदेच्या पटलावर आणली.