पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांची नेहमीच चर्चा होत असते. आता मोदींचा एक असाच मोठा चाहता चांगला चर्चेत आला आहे. कारण, मोदींच्या भेटीसाठी तो चक्क श्रीनगरहून दिल्लीच्या दिशेने चालत निघाला आहे. फहीम नजीर शाह असं या चाहत्याचं नाव आहे. पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी त्याने तब्बल ८१५ किलोमीटरचा प्रवास पायी करण्याची तयारी केली आहे. पंतप्रधानांचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि त्यांना भेटण्याची संधी मिळेल या आशेने त्याचा हा प्रवास सुरु झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पार्ट टाईम इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा फहीम नजीर शाह हा २८ वर्षीय तरुण आहे. २०० किमी चालल्यानंतर रविवारी (२२ ऑगस्ट) तो उधमपूरला पोहोचला. तो मूळचा श्रीनगरमधील शालीमार रहिवासी आहे. फहीमला विश्वास आहे की या कठीण प्रवासाच्या शेवटी त्याचं पंतप्रधानांना भेटण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या आपल्या या प्रवासात थोडी थोडी विश्रांती घेत तो दिल्लीच्या दिशेने अंतर कापत चालला आहे.

मोदी भेटीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले, पण आता…!

फहीम नजीर शाह आपला हा प्रवास, निश्चय आणि पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना असं म्हणाला कि, “मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे. मी त्यांना (मोदी) भेटण्यासाठी पायी चालत जात आहे.  पंतप्रधानांचं माझ्याकडे लक्ष जाईल याची मी आशा करतो. पंतप्रधानांना भेटणं हे माझं सर्वात मोठं आणि प्रिय स्वप्न आहे.” दरम्यान, यापूर्वी देखील शाहने पंतप्रधानांना भेटण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, ते निष्फळ ठरले.

फहीम असं सांगितलं की, गेल्या अडीच वर्षात त्याने दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. तो म्हणाला कि, “पंतप्रधानांच्या शेवटच्या काश्मीर दौऱ्यादरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला त्यांना भेटू दिलं नाही. मात्र, यावेळी मला खात्री आहे की मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी निश्चित मिळेल.”

…तेव्हापासून मी मोदींचा कट्टर चाहता झालो!

फहीम नजीर शाह याने सांगितलं की, “मी गेल्या चार वर्षांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींना फॉलो करत आहे. त्यांचं भाषण आणि हावभाव, कृती माझ्या हृदयाला स्पर्श करतात. एक प्रसंग सांगताना फहीम म्हणाला कि, “एकदा मोदी एका रॅलीमध्ये भाषण देत होते. त्यावेळी ‘अज़ान’ ऐकून ते अचानक थांबले. समोर बसलेल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यावेळी आमच्या पंतप्रधानांच्या या कृतीने माझ्या हृदयाला स्पर्श केला आणि मी तेव्हापासून त्यांचा कट्टर चाहता झालो आहे.”

मोदींच जम्मू-काश्मीरवर पूर्ण लक्ष!

२०१९ मध्ये जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर झालेल्या बदलांबद्दल विचारलं असता तो म्हणाला की, पंतप्रधान मोदी यांचं जम्मू -काश्मीरवर पूर्ण लक्ष आहे. म्हणूनच परिस्थितीत बदल दिसून येत आहे. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. विकास कामं चांगल्या गतीने होत आहेत.” फहीम यावेळी असंही म्हणाला की, मी शिक्षित आणि बेरोजगार युवकांच्या समस्यांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करू इच्छितो आणि केंद्रशासित प्रदेशातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करू इच्छितो.”