पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; ‘कलवरी’ पाणबुडीचे राष्ट्रार्पण
भारतीय संरक्षण दल हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण प्रांतांचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. समुद्रमार्गे सुरू असलेला दहशतवाद, तस्करी, बेकायदेशीर मासेमारी, चाचेगिरी या आव्हानांशी लढा देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मोदी यांच्या हस्ते गेल्या १५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली भारतीय बनावटीची ‘कलवरी’ या पाणबुडीचे गुरुवारी राष्ट्रार्पण झाले. मुंबईत पार पडलेल्या या सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संरक्षण दलाच्या कामाचे कौतुक केले.
संपूर्ण विश्व हे एक कुटुंब असून या कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भारताने पुढाकार घेतला आहे. परराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या वेळी सर्वप्रथम भारत धावून गेला आहे. यामुळे पाणबुडी विकासाचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ भारताचे संरक्षण हा मुद्दा लक्षात घेऊन केला नसून या संपूर्ण प्रांतांतील समुद्राचे संरक्षण करण्यासाठी आपण सक्षम आहोत, असे मोदी म्हणाले. यासाठी ‘सागर (SAGAR)’ हे धोरण आपण अधिक सक्षमपणे राबवीत आहोत. सागरचे पूर्ण स्वरूप ‘सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ असे आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये संरक्षण विभागात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यामुळे हा विभाग येत्या काळात अधिक सक्षम होईल, असेही मोदी म्हणाले. सुमारे १२० दिवस कलवरीच्या सर्व प्रकारच्या सागरी चाचण्या पार पडल्या. काही चाचण्यांमधील उणिवांनंतर नव्याने सुधारणा करून पुनर्चाचण्याही यशस्वी पार पडल्या.
- दीर्घकाळानंतर नौदलात पाणबुडी दाखल होत आहे. या पाणबुडीमुळे भारत आणि फ्रान्सचे संबंध अधिक दृढ होत असल्याचेही मोदी म्हणाले. पाकिस्तान आणि चीनकडून समुद्रमार्गे होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ही पाणबुडी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ८ डिसेंबर १९६७ रोजी भारतीय नौदलात पहिलीवहिली पाणबुडी दाखल झाली, तिचे नावही कलवरी असेच होते. ३१ मे १९९६ रोजी ती सेवेतून निवृत्त झाली.
- सध्या भारताकडे किलो वर्गातील रशियन, तर एचडीडब्लू या जर्मन बनावटीच्या पाणबुडय़ा कार्यरत आहेत. मात्र त्यातील बहुतांश पाणबुडय़ांच्या आयुष्यमानाचा मुख्य कालावधी संपलेला असून अतिरिक्त आयुष्यमानावर त्या कार्यरत आहेत.
- कलवरी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.ने ही पाणबुडी बांधली आहे. अशा प्रकारच्या आणखी सहा पाणबुडय़ा भारतीय नौदलात दाखल होणार असून कलवरी ही या ताफ्यातील पहिली पाणबुडी आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नौदल प्रमुख सुनील लांबा आदी मान्यवर उपस्थित होते.