पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाच मोदींनी लस घेतल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झालेली पहायला मिळाली होती. करोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी म्हणाले आहेत.

मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एम्स रुग्णालयात आज करोना लसीचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा”.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. एकूण १ लाख १५ हजार ७३६ इतके रुग्ण चोवीस तासांत सापडले आहेत. दिवसातील बळींची संख्या ६३० नोंदवली गेली आहे. २८ व्या दिवशीही वाढीचा कल कायम असून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या आता ८ लाख ४३ हजार ४७३ झाली आहे. हे प्रमाण एकूण संसर्गाच्या ६.५९ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा खाली घसरला असून ९२.११ टक्के झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ फेब्रुवारीला १ लाख ३५ हजार ९२६ होती. ते प्रमाण एकूण रुग्णांच्या १.२५ टक्के होईल. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ झाली आहे. मृतांचा दर कमी होऊन तो १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

देशात १ लाख ६६ हजार १७७ बळी गेले असून त्यात महाराष्ट्रातील ५६,३३०, तमिळनाडू १२,८०४, कर्नाटक १२,६९६, दिल्ली ११,११३, पश्चिाम बंगाल १०,३५५, उत्तर प्रदेश ८९२४, आंध्र प्रदेश ७२५१, पंजाब ७२१६ याप्रमाणे मृतांची संख्या आहे.