गुड मॉर्निंग ह्यूस्टन, गुड मॉर्निंग टेक्सास, गुड मॉर्निंग अमेरिका असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमातील आपल्या  भाषणाची सुरूवात केली.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भरभरून स्तुती करताना  भारताचा खरा मित्र जगात कोणी असेल तर तो व्हाइट हाऊसमध्येच आहे असे म्हटले. तसेच, अबकी बार, ट्रम्प सरकार असाही मोदींनी यावेळी नारा दिला. अब्जावधी लोक डोनाल्ड ट्रम्प यांचा शब्द न शब्द फॉलो करतात असेही मोदी म्हणाले. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचे मोठे वजन आहे. ट्रम्प यांनी नेहमीच आपलेपणा दाखला असल्याचेही मोदींनी सांगितले. तर ट्रम्प यांनी देखील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांची भरभरून स्तुती करताना,  पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत असल्याचे सांगितले. शिवाय लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मोदींचे अभिनंदनही केले.

मोदी म्हणाले की, आज दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रांच्या मैत्रीचा दिवस आहे व आज इतिहास घडत असताना संपूर्ण जग साक्षीदार आहे. मला २०१७ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या कुटूंबाची भेट घडवली होती असे सांगत, मी आज त्यांना माझ्या कुटूंबाची भेट घडवत असल्याचे म्हणत मोदींनी उपस्थित भारतीय नागरिकांकडे हात दाखवल्यानंतर नागिराकांनी जोरदार प्रतिसाद दिला. तसेच, अमेरिकेला महान बनवणं. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करणं हेच ट्रम्प यांचं ध्येय असून अमेरिकेने जगाला खूप काही दिलं आहे, असंही मोदी म्हणाले. ह्यूस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरू, शिकागोपासून शिमला आणि लॉस एंजिल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध आहेत, असंही मोदी यांनी यावेळी म्हटलं.

यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण करताना म्हटले की, पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी या ऐतिहासीक कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने मी अत्यंत आनंदी आहे. यावेळी ट्रम्प यांनी मोदींना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छाही दिल्या. ट्रम्प म्हणाले की, मी मोदींबरोबर आहे, हे मी माझे भाग्य समजतो. भारत-अमेरिका एकमेकांचा सन्मान करतात. मोदी यांच्या कार्यकाळात संपूर्ण जग भारताला एका मजबूत देशाच्या रूपात पाहत आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत मजबूत होत आहे. दोन्ही देशांची घटना ‘वी द पीपल्स’ ने सुरू होते. मोदींच्या कार्यकाळात ३० कोटी लोक गरीबी बाहेर आले आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने दोन्ही राष्ट्र एकमेकांबरोबर कार्यरत आहेत.  इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र आहे आणि भारतालाही अमेरिकेत माझ्यासारखा चांगला राष्ट्राध्यक्ष मिळाला नसेल असे सांगत, अमेरिका भारताबरोबर मिळून इस्लामिक दशतवादाचा सामना करेल असे ट्रम्प म्हणाले. तसेच, भारत- अमेरिका दरम्यान नव्या सुरक्षा भागीदारीवर काम होईल,  सीमा सुरक्षेच्या प्रश्नावर दोन्ही देश एकमेकांच्या बरोबर असतील. अवैध नागरिक आम्हाला अजिबात मान्य नाहीत. देव सगळ्याचं भलं करो, भारताचंही आणि अमेरिकेचंही असेही ट्रम्प यांनी यावेळी म्हटले.

या अगोदर अमेरिकेतील ‘टेक्सास इंडिया फोरम’च्यावतीने  आयोजीत ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर हजारो नागिराकांनी मोदी.. मोदी.. अशा गजरात अभूतपूर्व स्वागत केले. मोदींनी देखील सर्वप्रथम उपस्थित सर्व नागिरकांना हात जोडून अभिवादन केले. यानंतर त्यांनी अमेरिकन सिनेटर्सची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘की ऑफ ह्यूस्टन’ देऊन सन्मानित करण्यात आले.

भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मोदींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर थोडावेळाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाखल झाले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्रम्प यांचे या ठिकाणी स्वागत केले.

याअगोदर पंतप्रधान मोदी यांच्या आगमानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विट करत, टेक्सासमधील आजचा दिवस अविस्मरणीय असेल, ह्यूस्टन येथे आज आपल्या मित्राबरोबर राहणार असल्याचे म्हटले होते.

या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली होती, ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले होते. तसेच, विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या १५० जयंती निमित्त भारतीय व अमेरिकी गायकांकडून ‘वैष्णव जन’ हे भजन गावून विशेष आदरांजली अर्पण करण्यात आली.  या विशेष कार्यक्रमात ५० हजारांहून अधिक भारतीयांसह शेकडो अमेरिकी नागरिकांनी हजेरी लावली होती.  तीन तासांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ सातत्याने व्हाईट हाऊसच्या संपर्कात होते. शिवाय, भाजपाच्या परराष्ट्र व्यवहार विभाग व पीएमओ व्यवस्थेची देखरेख करत होते. पंतप्रधान मोदींचे शानदार स्वागत करण्यात आल्याने पीएमओकडून ह्यूस्टनचे आभार व्यक्त करण्यात आले.

तत्पूर्वी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी ह्यूस्टन येथे आलेल्या पंतप्रधान मोदी यांचे तेथील भारतीय नागरिकांच्या विविध गटांनी अतिशय उत्साहात स्वागत केले. काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी कलम ३७० हटवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.