Pariksha Pe Charcha 2020 with PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी मोदींनी चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या अपयशामध्येही सकारात्मकता कशी दडली आहे ते विद्यार्थ्यांना पटवून दिले.

सात सप्टेंबरला विक्रम लँडरचे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग पाहण्यासाठी मोदी सुद्धा बंगळुरुमधील इस्रोच्या नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित होते.

मोदींच्याच शब्दात ऐका त्या रात्री मनात नेमकं काय सुरु होतं?
विक्रम लँडरचे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग पाहण्यासाठी मी इस्रोच्या नियंत्रण कक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेकांनी मला तुम्ही जाऊ नका. लँडिंग यशस्वी होईल याची खात्री नाही. लँडिंग फेल झाले तर काय? असे प्रश्न उपस्थित करुन, तिथे जाऊ नये असा सल्ला दिला होता. अपयशाची शक्यता असल्यामुळेच मला तिथे जायचे आहे हे मी सल्ला देणाऱ्यांना सांगितले.

विक्रमचा चंद्रावरील लँडिंगचा प्रवास सुरु असताना, शेवटच्या काही मिनिटातील मी वैज्ञानिकांचे चेहरे पाहत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव, टेन्शन दिसत होते. काहीतरी चुकीच घडतय हे त्यांच्याकडे पाहून कळत होतं. काही मिनिटांनी त्यांनी मला येऊन, सर्व काही ठरल्याप्रमाणे घडत नसल्याची कल्पना दिली. दहा मिनिटांनी त्यांनी मला लँडिंगमध्ये अपयश आल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्यांना चिंता करु नका असे सांगितले.

काही वेळाने मी माझ्या हॉटेलवर निघून गेलो. पण माझ्या मनाला शांतता नव्हती. मी स्वस्थ बसू शकत नव्हतो. मला झोप येत नव्हती. पीएमओटी टीम त्यांच्या खोलीत निघून गेली होती. अर्धा-पाऊण तास असाच गेला. त्यानंतर मी सगळयांना बोलावलं. शास्त्रज्ञांना सकाळी भेटता येईल का? असं विचारलं. मी निघूनही जाऊ शकलतो असतो. कोणी त्याबद्दल काही बोलले नसते. पण माझ्या मनात घालमेल सुरु होती.

आणखी वाचा – Pariksha Pe Charcha 2020 : मोबाईलपासून दूर राहण्यासाठी मोदींनी दिला विद्यार्थ्यांना सल्ला

मी स्वत:ला समजावू शकत नव्हतो. सकाळी शास्त्रज्ञांना भेटलो त्यावेळी त्यांच्यासमोर मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या परिश्रमाचे कौतुक केले. त्यानंतर वातावरण फक्त तिथेच नाही तर, संपूर्ण देशात बदललं असे मोदींनी सांगितले. अपयशातही यशाचं शिक्षण घेता येतो. प्रत्येक प्रयत्नात उत्साह निर्माण करु शकतो. कुठल्या गोष्टीत तुम्ही अपयशी ठरलात तर त्याचा अर्थ तुम्ही यशाच्या दिशेने चालला आहात असा होतो असे मोदी म्हणाले.