21 November 2019

News Flash

Modi in Russia Live: मलेशियाच्या पंतप्रधानांकडे काढला झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून आज त्यांनी मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी भारतातून फरार होत मलेशियात आश्रय घेतलेल्या वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावर चर्चा केली. नरेंद्र मोदी आणि महाथिर मोहम्मद यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेल्या विनंतीसंबंधी प्रश्न विचारला असता विजय गोखले यांनी दोन्ही देशातील अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतील असा निर्णय झाला असल्याची माहिती दिली. यासंबंधी सविस्तर माहिती मात्र त्यांनी दिली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी केलेल्या चर्चेनंतर मलेशियाच्या पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “अशा गोष्टी नेतृत्त्व स्तरावर सोपवून चालणार नाही , त्यामुळे दोन्ही देशातील अधिकारी झाकीर नाईकचं कशा पद्दतीने लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण करत कायदेशीर कारवाई केली जाईल यावर चर्चा करणार आहे,”.

यावेळी दोन्ही पंतप्रधानांमध्ये दहशतवाद्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा त्यांनी यावेळी निषेध केला. दहशतवादाशी कशा पद्दतीने सामना करता येईल यावर त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती विजय गोखले यांनी दिली आहे. तसंच जम्मू काश्मीर आणि दोन्ही देशांमधील व्यापारावही त्यांच्यात चर्चा झाली.

झाकीर नाईक हा फरार असून त्याच्याविरोधात दहशतवदाशी संबंधित गंभीर आरोप आहेत. १ जुलै २०१६ रोजी ढाक्यात एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकचे नाव समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर आरोप लावले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या त्या हल्ल्यात तब्बल २० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

झाकीर नाईक वादग्रस्त ‘पीस टीव्ही’चा संस्थापक असून २०१७ पासून तो मलेशियात वास्तव्य करत आहे. सध्याच्या मलेशियन सरकारने झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याच्या सार्वजनिक भाषणांवर बंदी आणली आहे. त्याच्या सर्व हालचालींवर मलेशियन सरकारची नजर आहे.

First Published on September 5, 2019 11:28 am

Web Title: pm narendra modi malaysian pm mahathir mohamed zakir naik extradition sgy 87
Just Now!
X