केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राजीव महर्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच महत्त्वाच्या मंत्रालयाच्या कार्यभार सांभाळणाऱया सचिवांची बदली करण्यात आली आहे. मायाराम यांची तुलनेत कमी महत्त्वाच्या अशा पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मायाराम यांच्या बदलीला मान्यता दिल्यानंतर याबाबतचे आदेश काढण्यात आले. मायाराम हे १९७८च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. राजस्थानमधून ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. पर्यटन विभागाचे सचिव परवेझ दिवाण यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर मायाराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मायाराम यांच्या जागेवर १९७८च्या तुकडीचे राजस्थानमधीलच राजीव महर्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थखात्याकडे एकूण चार सचिव असतात. त्यामध्ये आर्थिक व्यवहार, खर्च, महसूल आणि आर्थिक सेवा अशी विभागणी असते. या चार सचिवांपैकी एकाला सेवाज्येष्ठतेनुसार अर्थसचिवपदाची जबाबदारी दिली जाते. राजीव महर्षी यांच्याकडे आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.