देशामध्ये करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरु झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच लस घेतल्याचा फोटो पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. मोदींनी करोनाची लस घेतल्यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरु होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोदींनी लस घेतल्याने लसीसंदर्भातील सर्व गैरसमज दूर होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

नक्की पाहा >> मोदींच्या लसीकरणाचे फोटो: जाणून घ्या कोणती लस घेतली?, पुढील डोस कधी? अन् लस घेतल्यावर ते काय म्हणाले?

“मला वाटतं मोदींनी स्वत: लस घेऊन या लसीसंदर्भात लोकांच्या मनात जे काही गैरसमज होते ते पूर्णपणे संपवले आहेत. मोदीजी स्वत:पेक्षा जे करोनाविरुद्धच्या लढ्यातील पहिल्या फळीतील करोना योद्धे आहेत त्यांची काळजी करता हे ही स्पष्ट झालं आहे,” असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, आता जो लसीकरणाचा टप्पा सुरु झालाय त्यामुळे वेगाने लसीकरण होईल. विशेष करुन ज्यांना करोनाचा धोका अधिक संभावतो असा वयोगटातील लोकांना यामध्ये लसीकरण केलं जाईल. पेड म्हणजेच पैसे देऊन लसीकरणाची सोयही उपलब्ध करुन दिलीय. तरी लसीच्या किंमतीवर कॅप म्हणजेच मर्यादा ठेवण्यात आली. त्यामुळे करोना लसीकरणाचा खूप वेग मिळेल, असा विश्वासही व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> …म्हणून मोदींनी सकाळी सात वाजताच घेतली लस; जाणून घ्या या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’

मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत करोना लस घेतल्याची माहिती दिली. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

या व्यक्तींना आजपासून मिळणार लस

६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाईल. पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी कमाल अडीचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

नक्की वाचा >> फोटोसाठी काय पण… ; लस घेताना मास्क न घातल्यामुळे मोदींवर नेटकरी संतापले

नोंदणी आवश्यक –

* पात्र नागरिकांनी ‘कोविन डिजिटल’ मंचावर (Android App) नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आगाऊ नोंदणी करता येऊ शकेल किंवा लसीकरण केंद्रातही लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.

* नोंदणी करताना नागरिकांनी आपली जन्मतारीख व इतर तपशील काळजीपूर्वक नमूद करावा. हा तपशील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा निर्धारित केलेल्या शासकीय कागदपत्रातील तपशिलानुसार असणे आवश्यक आहे.