इस्रायलकडून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदरातिथ्यात कोणतीही उणीव राहणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा दोन्ही देशांच्यादृष्टीने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळेच इस्रायल मोदींची विशेष काळजी घेत आहे. कालच इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांच्या जेरूसलेममधील बेट अॅगिऑन या निवासस्थानी पंतप्रधान मोदींसाठी जंगी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान विशेष शेफ्स मोदींच्या भोजनाची काळजी घेणार आहेत. मोदींची शाकाहारी आहारपद्धती डोळ्यासमोर ठेवून हे शेफ्स मोदींसाठी अस्सल भारतीय पदार्थ तयार करत आहेत. डेव्हिड बिटॉन हे या शेफ्सच्या टीमचे प्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधा आहार घेणे पसंत करतात. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी पारंपरिक भारतीय व्यंजने तयार करत असल्याची माहिती डेव्हिड बिटॉन यांनी दिली. मोदींना साधेच जेवण आवडते. ते शाकाहारी असल्यामुळे अंडी आणि इतर मांसाहारी पदार्थ खात नाहीत. आम्ही मोदीसाठी जेवण बनवण्यासाठी अनेक गोष्टी मागवून घेतल्या आहेत. यामध्ये अनेक मसाल्यांचा समावेश आहे. तसेच चांगल्या प्रतीचे तांदूळ, डाळी अशा अनेक गोष्टी आम्ही मागवून घेतल्या आहेत. भारतीय पदार्थ बनवण्याचा अनुभव आमच्यासाठी खूप खास आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या व्यक्तीसाठी जेवण बनवण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक असल्याचे बिटॉन यांनी सांगितले. याशिवाय, मोदींसाठी खास शाकाहारी पदार्थ करण्याची जबाबदारी रिना पुष्करणा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मोदींसाठी भारतीय खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आमचा भर साध्या पद्धतीचे भारतीय जेवण बनवण्यावरच असेल, असे रिना यांनी सांगितले.