पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. सर्वात आधी ते रवांडा नावाच्या छोट्याश्या देशाला भेट देणार आहे. ही भेट अत्यंत खास असणार आहे कारण हा देश जरी छोटा असला तरीही या देशाला २०० गायी भेट देण्याचा निर्णय घेतला. दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेला हा देश आहे. चीनचे राष्ट्रपतीही रविवारी रवांडा या ठिकाणी पोहचले आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

गिरिंका या उपक्रमा अंतर्गत देशातील पूर्व भागातून या गायींची खरेदी केली जाणार आहे. गिरिंका या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे एक गाय आवश्यक आहे. त्यामुळे या २०० गायींची खरेदी करण्यात येणार आहे. जेव्हा एखाद्या गायीला पिल्लू होईल तेव्हा ते शेजाऱ्याला भेट देण्यात येणार आहे. गरीबातल्या गरीब कुटुंबासाठी गाय हे उदरनिर्वाहाचे साधन असल्यानेच रवांडा येथील गरीब कुटुंबांना २०० गायी भेट देण्यात येणार आहे. घरात गाय असेल तर गरीब कुटुंबाला घरच्या घरीच दूध मिळेल असाही विचार यामागे आहे.

दरम्यान रवांडा हा देश छोटा असला तरीही राजधानीचे शहर असलेल्या किगलीत अत्यंत रचनात्मक रित्या मेट्रोचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच किगलीमध्ये आणि संपूर्ण देशात वेळेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या देशाचा आदर्श भारतानेही घ्यायला हवा कारण हा देश १९९४ नंतर विकसित व्हायला सुरूवात झाली. याआधीचा रवांडाचा इतिहास हा नरसंहार सांगणारा आहे.

महिला सशक्तीकरणातही रवांडा हा देश अव्वल स्थानी आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी भारतात होते आहे. यासंबंधीचे विधेयक भारतात प्रलंबित आहे. मात्र रवांडामध्ये दोन तृतीयांश महिला या खासदार आहेत. ही संख्या निश्चितच जास्त आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर २४ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी युगांडा येथे जाणार आहेत अशीही माहिती मिळते आहे.