पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, यावेळी त्यांना अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी निमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी तेथील काही सदस्यांनी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांकडे केली आहे. ७ आणि ८ जूनला मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून किंवा व्हाईट हाऊसकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रिपब्लिकन समितीचे अध्यक्ष एड रॉयस आणि डेमोक्रॅटिक समितीचे एलिट एंजल यांनी प्रतिनिधीगृहाचे सभापती पॉल ऱ्यान यांना पत्र लिहिले असून, नरेंद्र मोदींना संयुक्त बैठकीपुढे भाषणासाठी निमंत्रित करण्याची मागणी केली आहे. विविध क्षेत्रात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सहकार्यपूर्ण संबंध आहेत. संरक्षण, आपत्ती निवारण, अंतराळ संशोधन, नावीन्यता या सर्वच क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटते की या संदर्भात थेट भारताच्या पंतप्रधानांकडून ऐकण्याची ही सुयोग्य संधी आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपुढे संवाद साधण्याची संधी मिळणे हे सर्वोच्च गौरवाचे समजले जाते. त्यामुळे मोदींना ही संधी मिळाल्यास ते भारतासाठीही गौरवास्पद ठरणार आहे.