“भारतानं कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केलं आहे, आपलं आयुष्य वेचलं आहे. संपूर्ण जगानं आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानंच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला. आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोबलही वाढवलं.

आणखी वाचा- लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं – मोदी

“जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानंचं मानवतेचा विनाश करण्याचं काम केलं. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. सपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटलं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- ‘आपण चर्चा करतोय ना? मग असं कशाला करायचं?’; मोदींच्या लडाख भेटीनंतर चीनची नरमाई

“तुमचं शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेलं समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठिण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. तुमचं साहस, तुमचं शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठं आहे, असं ते यावेळी म्हणाले. “तुमचे बाहू इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहे. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे, मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचंच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरलं आहे” असं म्हणत त्यांनी जवानांचं मनोबल बाढवण्याचा प्रयत्न केला. तसंच सीमाभागात पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा तीन पट अधिक खर्च करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.