पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा कमालीचा यशस्वी झाल्याचा दावा व्हाइट हाउसकडून करण्यात आला आहे. मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवसंजीवनी मिळाली आहे, असेही व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
नरेंद्र मोदी आणि ओबामा यांची भेट आमच्या दृष्टिकोनातून कमालीची यशस्वी झाली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवसंजीवनी मिळाली आहे, असे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील ज्येष्ठ संचालक फिल रेनर यांनी म्हटले आहे.
जागतिक पातळीवर भारताची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी भारताला अमेरिकेचा नेहमीच पाठिंबा राहील आणि दोन्ही देशांच्या नेत्यांच्या भेटीमुळे उभयतांना पुढे जाण्याबाबतचा दृष्टिकोन ठरविण्याची संधीच प्राप्त झाली आहे, असे रेनर यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांमधील भेट ही दोन सरकारमधील भेट नव्हती तर अमेरिकेतील समाज, खासगी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारतीय खासगी क्षेत्र अशा व्यापक पातळीवरील होती, असे दक्षिण आणि मध्य आशियातील घडामोडींशी संबंधित परराष्ट्र व्यवहार उपमंत्री निशा देसाई-बिस्वाल यांनी स्पष्ट केले.
काश्मीरचा उल्लेखही नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली तेव्हा काश्मीर हे नावही उच्चारण्यात आले नाही, असा दावा अमेरिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
तथापि, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह शेजारील देशांच्या नेत्यांना निमंत्रित करून त्या देशांशी उत्तम संबंध स्थापित करण्याच्या मोदींच्या प्रयत्नांना ओबामा यांनी पाठिंबा दर्शविला आहे, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मोदी आणि ओबामा भेटीदरम्यान काश्मीर हे नावही उच्चारण्यात आला नाही, असे आपण खात्रीपूर्वक सांगतो, असे फिल रेनर यांनी माध्यमांच्या निवडक प्रतिनिधींशी बोलताना या वेळी सांगितले.