देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याने काँग्रेस त्यांच्यावर वारंवार हल्लाबोल करीत आहे. देशभरात सध्या गाजत असलेल्या पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या कृत्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत हा घोटाळा का आणि कसा झाला? याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.


माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हवाल्याने राहुल गांधी म्हणाले, इतका मोठा घोटाळा मोठ्या संरक्षणाशिवाय शक्य नाही. काँग्रेसच्या संचालन समितीच्या बैठकीनंतर राहुल गांधींनी माध्यामांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मुलांना परीक्षा कशी द्यायला हवी याचे मार्गदर्शन करीत आहेत. मात्र, हा घोटाळा कसा झाला याची माहिती देत नाहीत.

या घोटाळ्याची सुरुवात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यावेळी झाली जेव्हा पंतप्रधानांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या आणि देशाचा सर्व पैसा बँकींग प्रणालीमध्ये टाकला होता. यामुळेच नीरव मोदीला बँकांमधून पैसे उपलब्ध झाले, असा दावा यावेळी राहुल गांधींनी केला. ते म्हणाले, जनतेच्या या पैशांच्या घोटाळ्याला कोण जबाबदार आहे.

या घोटाळ्याबाबत ज्या लोकांनी बोलू नये असे लोक आज स्पष्टीकरण देत आहेत. तर पंतप्रधानांवर या घोटाळ्याबाबत बोलण्याची जबाबदारी आहे ते यावर गप्प बसले आहेत. इतक्या मोठ्या घोटाळ्याकडे पंतप्रधान दुर्लक्ष कसे करु शकतात. नीरव मोदीसोबत आपले व्यक्तिगत संबंध आहेत या राहुल गांधींना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.