नवाझ शरीफ यांच्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहिद खाकान अब्बासी विराजमान होणार आहेत. अब्बासी हे पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारणार असून नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ हे खासदार म्हणून निवडून येईपर्यंत अब्बासी हे पंतप्रधानपदी कायम असतील.

सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ’ (पीएमएल-एन) पक्षाच्या शनिवारी दोन बैठका पार पडल्या. नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही बैठका पार पडल्या. या बैठकीत पंतप्रधानपदाविषयी चर्चा झाली. पहिली बैठक अनौपचारिक होती. तर दुसरी बैठक पक्षाच्या संसदीय समितीची पार पडली. या बैठकीत चौधरी निसार अली खान, एहसान इक्बाल, अयाज सादिक, साद रफिक, राणा तनवीर, शाहिद खाकान अब्बासी, शाहबाज शरीफ आणि अन्य महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीत शाहिद खाकान अब्बासी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. संसदेत शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याने पंतप्रधानपदाला तूर्तास तरी धोका नाही. शरीफ यांचे बंधू आणि सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असलेले शाहबाज शरीफ हे शरीफ यांचे उत्तराधिकारी असतील. पण शाहबाज यांना आधी खासदार म्हणून निवडून यावे लागेल. यासाठी नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरुन शाहबाज शरीफ निवडणूक लढवतील. हा मतदारसंघ शरीफ कुटुंबीयांचा बालेकिल्ला असून शाहबाज शरीफ यांचा विजय निश्चित मानला जात आहे. संसदेत निवडून गेल्यावर शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होतील. मात्र या कालावधीत शाहिद खाकान अब्बासी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळतील. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले असून अद्याप याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी पनामा पेपर्सच्या माध्यमातून पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बिंग फुटले होते. इम्रान खान यांच्या ‘तेहरीक- ए- इन्साफ’ या पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी संयुक्त तपास पथकाची स्थापना केली होती. या समितीच्या अहवालाच्या आधारे शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. नवाझ शरीफ यांनी घटनेची पायमल्ली केली असून ते पंतप्रधानपदासाठी अपात्र आहेत असे कोर्टाने म्हटले होते. या निकालानंतर शरीफ यांनी राजीनामा दिला होता.