पंजाब नॅशनल बॅँकेत झालेल्या १३,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे. चौकशीदरम्यान ही बाब समोर आली आहे की, मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्सला २५०० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्या कंपनीचे संचालक १२ ते १५ हजार रुपये महिन्याचा पगार घेणारे लोक आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, गितांजली जेम्सला कर्ज देणाऱ्या कंपन्या एशियन इंपॅक्स, प्रीमियर इंटरट्रेड आणि आयरिश मर्चंटाईल या कंपन्या आहेत. या संचालकांनी चोक्सीच्या गितांजली जेम्सला चेक देण्यात सूट दिली होती. त्यामुळे हा प्रकार बनावट कंपन्यांशी जोडलेला असण्याची शंका उपस्थित होत आहे.
यावरुन ही बाब लक्षात येते की, बनावट कंपन्या ज्या केवळ कागदावरच असतात. त्या चेकमध्ये सूट देतात. या बनावट कंपन्या ज्यांचा कोणताही व्यवसाय नसतो. केवळ सर्विस प्रोव्हायडर कंपन्यांची खोटी बिले अन्य कंपन्यांना देण्याचे काम ते करतात. यासाठी भरण्याचा चेकही बनावट कंपन्यांच्याच नावावर येतात. त्यानंतर या बनावट कंपन्या ते चेक बॅँकेत जमा करतात. त्यानंतर मिळालेली रक्कम ते दुसऱ्या बनावट कंपन्यांच्या खात्यात जमा करतात. यासाठी या कंपन्यांना एक टक्का कमिशनही मिळते, अशा स्वरुपाचा त्यांचा कारभार चालतो.
तपास कंपन्यांनी या कथित संचालकांचे जबाब नोंदवले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व संचालक दक्षिण मुंबईतील ओपेरा हाऊसमध्ये हिऱ्यांच्या कारखान्यात काम करीत आहेत. चौकशी करणाऱ्या पथकाला संशय आहे की, कर्ज देणाऱ्या कंपन्या मेहुल चौक्सीच्याच असण्याची शक्यता आहे. कर्जाची रक्कम वळवण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला आहे. दरम्यान, उल्लेखनीय बाब ही आहे की, मेहुल चौक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे पीएनबी बँकेचे पैसे बुडवून फरार झाल्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. हे दोघेही सध्या देशातून पळून गेले आहेत. पीएनबी घोटाळा उघडकीस येण्याआधी काही दिवस ते फरार झाले होते.