पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानवरील दावा सोडून द्यावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी मोहीम सुरू केली आहे.  भारतीय झेंड्याबद्दल केलेलं वक्तव्य आणि जम्मू-काश्मीरमधे आर्टिकल ३७० पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत मागितल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांनी भारत सोडून पाकिस्तान आणि चीनमध्ये स्थायिक व्हावे असे इंद्रेश कुमार म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या परिषदेत कुमार यांनी हे वक्तव्य केले.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी फारूख अब्दुल्ला यांनी चीनकडे मदत मागितली, त्यावर तुम्ही  चीनला निघून जा, असे इंद्रेश कुमार फारुख अब्दुल्ला यांना म्हणाले.

आणखी वाचा- … आम्ही आघाडी केली तर तो राष्ट्रद्रोह; अमित शाहांवर मेहबुबा मुफ्तींचा पलटवार

तिरंग्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यावरही इंद्रेश कुमार यांनी टीका केली. जम्मू काश्मीर मधील लोकांनी मेहबूबा मुफ्ती यांना पाहिजे तिथे निघून जा असं सांगितलं आहे, असे इंद्रेश कुमार म्हणाले.

केंद्र सरकारने ३७० कलम हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तिथल्या नेत्यांना तुरूंगात टाकाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना वाईट वाटले नाही असा दावा गुपकर ठरावाबद्दल बोलताना  इंद्रेश कुमार यांनी केला.

आणखी वाचा- ‘गुपकार गँग’ने देशाचा मूड सांभाळला नाहीतर … – अमित शाह

“कुणीही संताप व्यक्त केला नाही, निषेध मोर्चे काढले नाहीत, त्यांच्या बाजूने आंदोलनं केली नाहीत. काश्मीर खोऱ्यामध्ये कुठेही बंद पाळण्यात आला नाही. त्याऐवजी ज्यांनी लोकांना लुटले ते तुरूंगात गेले याचा नागरिकांना आनंदच झाला असे इंद्रेशकुमार म्हणाले.”७० वर्षानंतर आता भारत एक राष्ट्र झाला आहे. देशात एक राष्ट्र, एक ध्वज, एक संविधान, एक नागरिकत्व, एक घोषणा आणि एक राष्ट्रगीत आहे” असेही इंद्रेश कुमार यांनी सांगितले.