सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बुरखा घातलेली माहिला एका सुपरमार्केटमध्ये गणपतीच्या मूर्ती मांडणीवरुन (शेल्फवरुन) खाली ढकलताना दिसत आहे. अनेक पेजेसवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कारवाई केली असून या ५४ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बुरखा घातलेली माहिला एका सुपरमार्केटमध्ये गणपतीच्या मूर्ती जेथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत तेथे येऊन आरडाओरड करते. त्यानंतर ती मांडणीवर ठेवलेल्या गणपतीच्या मूर्ती खाली ढकलत अरबी भाषेत काहीतरी ओरडताना दिसत आहे. हा सर्व प्रसंग तेथील अन्य एका महिला ग्राहकाने मोबाइलवर शूट केला. मुस्लीम देशामध्ये गणपतीच्या मूर्ती का विकल्या जात आहे असा आक्षेप नोंदवत या महिलेने मूर्ती मांडणीवरुन खाली ढकलल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. “हा मोहम्मद बीन इसाचा देश आहे. ते हे मान्य करतील असं तुम्हाला वाटतं का?, हा मुस्लीम देश आहे. बरोबर ना?,” असं ही महिला दुकानदाराशी हुज्जत घातलाना ओरडत आहे. “आता या मूर्तीची पूजा कोण करत बघू, करा पोलिसांना फोन,” असं म्हणत ही महिला दोन ते तीन मूर्ती खाली ढकलून त्यांचे नुकसान करते.

ही सर्व घटना बहरीनची राजधानी असणाऱ्या मनामाजवळच्या जुफेरमधील सुपरमार्केटमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सध्या भारतामध्ये प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मात्र काहीजण हा मध्य आशियामधील देशांमधील असल्याचे सांगत आहेत तर काहींनी थेट केरळवगैरेमधील असल्याचा दावा केला आहे. मात्र हा व्हिडिओ बहरीनमधील असून या प्रकरणी पोलिसांनी करावाईही केली आहे.

या प्रकरणामध्ये बहरीन पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून गणेश मूर्तीचा अवमान करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहरीनमधील इंटीरीयर मिनिस्ट्री म्हणजेच अंतर्गत सुरक्षेसंदर्भातील मंत्रालयाने ट्विटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. या महिलेवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

बहरीनच्या राजाचे माजी सल्लागार खलीद- अल खलीफा यांनी या महिलेची कृती योग्य नव्हती असं मत व्यक्त केलं आहे. “धार्मिक प्रतिकांचे नुकसान करणं हे बहरीनमधील लोकांच्या स्वभावात नाही. हा द्वेष परसवणारा गुन्हा असून त्याला नकारलं पाहिजे. येथे सर्व धर्माचे आणि स्तरातील लोकं एकत्र राहतात,” असं खलीफा यांना म्हटलं आहे.  बहरीनमध्ये जवळजवळ चार लाख भारतीय राहतात. तर २०१० च्या जनगणने नुसार येथील ९.८ टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे.