बलात्काराचा प्रयत्न रोखण्यासाठी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनमधून उडी मारुन महिलेला वाचवलं असल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईत ही घटना घडली असून शिवाजी असं या शूर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. २५ वर्षाच्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात येताच शिवाजी याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि तरुणीला वाचवलं. आरोपी सत्यराज याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरपीएफ कॉन्स्टेबल के शिवाजी हा पोलीस उपनिरीक्षक आणि एका सहकाऱ्यासोबत ट्रेनमध्ये पेट्रोलिंग करत होता. ट्रेन चेन्नई बीचच्या दिशेने प्रवास करत होती. रात्री ११.४५ च्या दरम्यान शिवाजीला एका तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ट्रेनचे डबे एकमेकांना जोडलेले नसल्या कारणाने दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी ट्रेनमधून उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. प्लॅटफॉर्म जवळ येत असल्या कारणाने शिवाजीने ट्रेनची गती कमी होण्याची वाट पाहिली. ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली तेव्हा शिवाजी याने ती पूर्ण थांबण्याची वाट न पाहताच ट्रेनमधून उडी मारली आणि दुसऱ्या डब्यात पोहोचला.

तिथे पोहोचल्यानंतर आरोपी सत्यराज महिलेवर जबरदस्ती करत असल्याचं त्याने पाहिले. धक्का देऊन त्याने सत्यराजला खाली पाडलं आणि तरुणीची सुटका केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शिवाजी यांच्यासोबत असणारे इतर कर्मचारी पोहोचले तेव्हा महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या ओठातून रक्त वाहत होतं, कपडेही फाटलेले होते. तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपी सत्यराजवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीआरपीच्या प्रमुखांनी पीडित तरुणीची भेट घेतली असून, शिवाजी याच्यामुळेच तिची सुटका झाल्याचं सांगितलं. शिवाजी याने दाखवलेल्या हिंमतीसाठी पाच हजार रुपयांचं रोख बक्षिस देण्यात आलं आहे.