तीन संस्थांच्या संशोधनातील निष्कर्ष
दिल्लीतील हवेबाबत गेली अनेक वष्रे संशोधन करणाऱ्या संस्थांनी तेथील हवाप्रदूषण २०२० पर्यंत १९ पटींनी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, आयआयटी रूरकी, अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठ, ब्रिटनमधील सरे विद्यापीठ यांनी २००८ ते २०१५ अशी आठ वष्रे दिल्लीतील हवेचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते १९९१ ते २०११ या काळात दिल्लीत वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंचे प्रमाण तिप्पट वाढले आहे.
संशोधकांनी सांगितले की, २०२० पर्यंत हे प्रदूषण आणखी वाढणार आहे. अटमॉस्फेरिक एनव्हरॉन्मेंट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. खासगी वाहनातून म्हणजे मोटारी व दुचाकी वाहनातून कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन, पीएम १० (पार्टक्यिुलेट मॅटर), कार्बन मोनॉक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड व बुटाडाईन, अ‍ॅसेटाल्डिहाइड, बेंझिन, फॉरमॅल्डीहाईड, अल्डीहाईड, पॉलि अरोमेटिक हायड्रोकार्बनचे प्रमाण २०११ ते २०१५ या काळात २०११ च्या तुलनेत २ ते १३ पट वाढले आहे.
दुचाकी वाहनांमुळे विषारी द्रव्ये वाढत आहेत. त्यात फॉरमॅल्डीहाईड (३७ टक्के), हायड्रोकार्बन (३५ टक्के) अ‍ॅसेटाल्डिहाईड (६४ टक्के) यांचा समावेश आहे. खासगी मोटारीतून कार्बन मोनॉक्साईड (३४ टक्के), बेन्झीन (४८ टक्के), अल्डीहाईड (४० टक्के) ही विषारी द्रव्ये बाहेर पडतात. जड व्यावसायिक वाहनातून ४६ टक्के प्रदूषक कण बाहेर पडतात असे दिसून आले आहे तर डिझेल मोटारींमुळे दिल्लीत १० टक्के प्रदूषण होते. वीस वर्षांतील प्रदूषकांचा आढावा त्यात घेतला आहे. हा अभ्यास मिनेसोटा विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड एनव्हरॉन्मेंट पॉलिसी संस्थेचे अजय नागपुरे, आयआयटी रूरकीचे विवेक कुमार व सरे विद्यापीठाचे प्रशांत कुमार यांनी केले आहे.
नागपुरे यांनी सांगितले की, दिल्लीतील प्रदूषण पातळी धोकादायक पातळीच्यावर आहे. आताच उपाय केले नाहीत तर आणखी हानी होईल. १९९१ ते २०११ चा अभ्यास करताना वाहन हवा प्रदूषण नोंदींचा आधार घेतला आहे. ब्रेक लावणे, खराब रस्ते, टायरची अवस्था, रस्त्यावरची धूळ यांचा विचार यात केला आहे. पीएम १० उत्सर्जन हे टेलपाईप व इतर कारणांमुळे होते त्याचा वाटा प्रदूषणात १६ टक्के असतो तर रस्त्यावरील धुळीचा वाटा ७७ टक्के, ब्रेक वापराचा वाटा ६ टक्के असतो असे २०१५ च्या संशोधनात दिसून आले. २०२० मध्ये रस्त्यावरील धुळीचा प्रदूषणातील वाटा ७९ टक्के राहील.
प्रदूषणामुळे मूत्रिपडाचे आजार, कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, मेंदूचे आजार होतात. घराबाहेरील हवा प्रदूषणामुळे अनेकांना कर्करोग होतो. आगामी काळात बसेसमुळे प्रदूषण वाढणार आहे, २०११-१५ दरम्यान मोटारींचे प्रदूषण ३०- ३४ टक्के होते त्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे यापुढे बसमुळे होणारे प्रदूषण वाढत जाणार आहे. मोनो नायट्रोजन ऑक्साईडचे प्रदूषण वाढले असून त्याच्या वाढीचे प्रमाण वर्षांला १४ टक्के आहे. दुचाकी वाहनातून २०११ पासून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे.