घसरत चाललेले तापमान, वाऱ्यांचा मंदावलेला वेग व शेजारील राज्यात शेतांमध्ये भाताच्या पिकातील तुसाच्या स्वरूपातील अवशेष जाळण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आगींच्या संख्येतील वाढ यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची समस्या पुन्हा अति धोकादायक बनली असून तेथील हवेचा दर्जा मंगळवारी सकाळी अति धोकादायक  प्रवर्गात मोडणारा होता.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत मोसमातील सर्वात कमी म्हणजे ११.७ सेल्सियस तापमानाची नोंद झाली. हे तापमान या कालावधीतील  सरासरीच्या दोन अंशांनी खाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले, की तापमानात घसरण होत असल्याने हवा थंड व दाट  बनली आहे. त्यामुळे  हवा प्रदूषक कण धरून ठेवत आहे. परिणामी  प्रदूषणाची एकूण पातळी वाढत चालली आहे.

मंगळवारी दिल्लीत एकूण हवा दर्जा निर्देशांक हा दुपारी १२.३० वाजता ४१७ इतका नोंदला गेला असून सोमवारी दुपारी ४ वाजता तो ३६० होता. पीएम १० कणांचे प्रमाण वाढून ते दर घनमीटरला ४३६ मायक्रोग्रॅम झाले.

प्रति घनमीटरला १०० मायक्रोग्रॅम हे प्रमाण सुरक्षित मानले जाते. त्यामुळे या प्रदूषक घटकांची पातळी चार पट वाढली आहे. दिल्लीतील ३७ हवा निर्देशांक मापन केंद्रांनी जे मापन केले त्यानुसार हवेची प्रदूषण पातळी अति गंभीर स्वरूपाची होती. बवाना येथे सर्वात जास्त प्रदूषण नोंदले गेले असून तेथील निर्देशांक ४४५ होता. त्या खालोखाल आनंद विहार ४४२, वझीरपूर ४४२, द्वारका ४४२, फरिदाबाद ४०४, गाझियाबाद ४४५, बृहत नॉयडा ४३६, नॉयडा ४३६ या ठिकाणांचे हवा निर्देशांकही घातक होते.

वाऱ्याचा वेग मंदावला 

वाऱ्याचा वेग ताशी २० कि.मी.वरून १० कि.मी. झाला असून त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. हरयाणा व पंजाब या राज्यांत पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांत वाऱ्यांचा वेग कमी राहणार आहे. सरकारच्या सफर या  प्रदूषण निरीक्षण संस्थेच्या मते मंगळवारी पिकांचे अवशेष जाळण्याचा प्रदूषणातील वाटा २५ टक्के तर सोमवारी १८ टक्के होता.