नवी दिल्ली : पारले या देशातील सर्वात मोठय़ा बिस्कीट उत्पादन कंपनीला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. मागणीतील घसरण कायम राहिली तर येत्या काळात आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीच्या बिस्कीट विक्रीमध्ये प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे उत्पादनही कमी करावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचारीकपात करण्याची वेळ येऊ शकते, असे पारले प्रोडक्ट्सचे कॅटेगरी प्रमुख मयंक शहा यांनी सांगितले. तसेच १०० रुपये प्रति किलो किंवा त्याहून कमी किंमत असलेल्या बिस्किटांवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. ही बिस्किटे सामान्यत: ५ रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या पाकिटांमध्ये विकली जातात. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही, तर कंपनीच्या कारखान्यांमधील ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय उरणार नाही. घसरणाऱ्या विक्रीमुळे आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे, असे शहा म्हणाले.

१९२९ साली स्थापन करण्यात आलेल्या पारले कंपनीच्या मालकीचे १० कारखाने आणि १२५ बाह्य़ (थर्ड पार्टी) उत्पादकांची संयंत्रे यांत मिळून सुमारे १ लाख कर्मचारी आहेत. जीएसटी लागू झाल्यापासून पारले-जी सारख्या बिस्किटांची मागणी घसरत आहे. त्यात ५ रुपये इतकी कमी किंमत असलेल्या बिस्किटांवरही मोठा कर लावला जातो. कमी किमतीच्या बिस्किटांवर मिळणारा लाभही कमी असतो. जीएसटी लागू होण्यापूर्वी १०० रुपये प्रति किलोहून कमी किमतीच्या बिस्किटांवर १२ टक्के कर आकारला जात होता. प्रीमियम बिस्किटांसाठी १२ टक्के, तर स्वस्त बिस्किटांवर ५ टक्के या दराने जीएसटी आकारला जाईल, अशी अपेक्षा होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर सर्व प्रकारच्या बिस्किटांचा समावेश १८ टक्क्य़ांच्या करटप्प्यात केला. त्यामुळे कंपन्यांना किमती वाढवाव्या लागल्या. त्याचा परिणाम विक्रीवर झाला. पारले कंपनीलाही किमती ५ टक्क्य़ांनी वाढवाव्या लागल्या आणि त्यामुळे विक्रीत घट झाली, असे शहा यांनी सांगितले.

घसरलेल्या मागणीबाबत बिस्किटे व डेअरी उत्पादनांची मोठी कंपनी असलेल्या ब्रिटानियानेही चिंता व्यक्त केली आहे. अगदी ५ रुपये किमतीची उत्पादने विकत घेतानाही ग्राहक दोन वेळा विचार करत आहेत’, ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेत काही गंभीर समस्या असल्याची ही चिन्हे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.