शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी विमानात घातलेल्या गोंधळानंतर एअर इंडियाने आता बेशिस्त प्रवाशांचे ‘पंख’ छाटण्याचे ठरवले आहे.त्यानुसार आता अशा दंगेखोर प्रवाशांना ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात येईल. या यादीतील प्रवाशांना बंदीच्या कालावधीत एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करता येणार नाही.

तीन प्रकारांमध्ये या शिक्षेची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसऱ्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ यासारखी कृती तर तिसऱ्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. त्यानुसार संबंधित प्रवाशांवर अनुक्रमे तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षांसाठी निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून शुक्रवारी या नव्या नियमांची घोषणा करण्यात आली. बेशिस्त आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवाशांना जरब बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

मार्च महिन्यात रवींद्र गायकवाड यांनी बिझनेस श्रेणीचे तिकीट असूनही इकॉनॉमी श्रेणीत बसविण्यात आल्यावरून वाद घालत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. देशभरात या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर एअर इंडिया आणि सहा खासगी विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्यावर हवाईबंदी घातली होती. त्यामुळे राजकीय नेते आणि विमान कंपन्यांमध्ये संघर्ष पेटला होता. या संघर्षाचे पडसाद थेट संसदेपर्यंत उमटले होते. अखेर केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतल्याने हा वाद मिटला होता. मात्र, या एकूणच प्रकरणात विमान कंपन्यांनी नेहमीपेक्षा कठोर पवित्रा घेतल्याचे दिसून आले होते.