काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अमेठी दौरा करणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज अमेठीमध्ये एक पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना रामाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. अमेठीतील गौरीगंज रेल्वे स्टेशनवर हे पोस्टर लावण्यात आले आहे.

रामाच्या रूपात दाखवण्यात आलेले राहुल गांधी धनुष्यबाण घेऊन  रावणाच्या रूपात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करत आहेत. असे हे पोस्टर आहे. रावणाच्या रूपात दाखवण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळ्यातून रक्त येते आहे असेही या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे पोस्टर ट्विट केले आहे.

‘राहुल मे भगवान राम का अवतार’; २०१९ मे आयेगा राहुल राज  (रामराज्य) असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने
हे पोस्टर लावण्यात आपला कोणताही हात नाही असे म्हटले आहे. अभय शुक्ला नावाच्या एका स्थानिकाने हे पोस्टर लावले आहे अशी
माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी काळा पैसा परत आणू, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करू या आणि अशा अनेक घोषणा दिल्या होत्या. त्यांच्या सगळ्या घोषणा पोकळ निघाल्या. त्यांना काहीही अर्थ नाही. त्याचमुळे आम्हाला आता हा विश्वास वाटू  लागला आहे की काँग्रेसचे राज्यच देशाला चांगले भविष्य देऊ शकेल. त्याचमुळे मी राहुल गांधी यांना रामाच्या रूपात दाखवून २०१९ मध्ये रामराज्य येईल असे म्हणत हे पोस्टर लावले आहे. अशी माहिती अभय शुक्ला या स्थानिकाने एएनआय या
वृत्तसंस्थेला दिली आहे.

अमेठी हा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. तसेच हा गांधी घराण्याचाही मतदारसंघ आहे. या ठिकाणी काँग्रेसने ६० वर्षात कोणता विकास केला? असा प्रश्न विचारत भाजपने राहुल गांधी आणि गांधी घरण्यावर टीका केली होती. आता सोमवारी राहुल गांधी हे अमेठीचा दौरा करणार आहेत त्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच एका स्थानिकाने पोस्टर लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध केला आहे. तर राहुल गांधी यांच्या
रूपाने देशात रामराज्य येईल असे म्हटले आहे.