पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मोदींविरोधात वाराणसीमधून लोकसभा निवडणुक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. आता वाराणसीपाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही अशीच मागणी केली आहे. प्रियंका गांधींनी गोरखपूरमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. या मागणीसंदर्भातील पोस्टरबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोरखपूरमध्ये सुरु केली आहे. या पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना मणिकर्णिकेच्या रुपात दाखवण्यात आले आहे.

भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या गोरखपूर मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यापैकी काही पोस्टर्समध्ये २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव होईल असंही लिहीण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये योगी अदित्यनाथ यांनी २०१७ साली मुख्यमंत्री पदासाठी खासदारकी सोडल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला होता हेही नमूद करण्यात आले आहे. तसेच पोस्टरवर ‘गोरखपूर की यही पुकार, प्रियंका गांधी संसद इस बार’ असे स्लोगन्सही लिहीण्यात आले आहे. तसेच या पोस्टरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पुढील पंतप्रधान असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तर दुसऱ्या पोस्टर्समध्ये मणिकर्णिकेच्या पोस्टरवर प्रियंका यांचा चेहरा लावण्यात आला आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ सिनेमाच्या पोस्टरवरच एडिटींग करुन हे पोस्टर तयार करण्यात आले आहे. या पोस्टवर ‘चारो तरफ बज रहा डंका, बहन प्रियंका… बहन प्रियंका’ आणि ‘देश की यही पुकार, काँग्रेस आऐ अबकी बार’ हे स्लोगन्सही लिहीण्यात आले आहेत.

गोरखपुरमधून योगी अदित्यनाथ हे सलग चार वेळा निवडणून आले आहेत. १९९८ ते २०१७ या काळामध्ये योगी अदित्यनाथ यांनी १२व्या, १३व्या, १४व्या आणि १५व्या लोकसभेमध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. मात्र २०१७ साली राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतली. मात्र त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा गोरखपुरमध्ये पराभव झाला. सध्या समाजवादी पक्षाचा पाठिंबा असणारे प्रविण निशाद हे गोरखपुरचे खासदार आहेत.