पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जाहीर केली. योजना जाहीर करुन २४ तास होत नाहीत तर एक हजारहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेणारे सर्वाधिक नागरिक छत्तीसगड आणि हरियाणा येथील आहेत. त्यानंतर झारखंड, आसाम आणि मध्यप्रदेशमधील लोकांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. रविवारी रांचीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मोदींनी या योजनेची घोषणा केली, त्याचवेळी पाच जणांना योजनेची कार्ड मोदींच्या हस्ते देण्यात आली. जमशेदपूरमधील पूनम माहतो या स्त्रीने जन्म दिलेली मुलगी या योजनेची पहिली लाभार्थी ठरली.

योजना जाहीर केल्यानंतर काही तासांत रांची इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये चार रुग्णांना भरती करण्यात आले. ग्रामीण भागातील आठ कोटी तीन लाख कुटुंबे, तर शहरी भागातील दोन कोटी ३३ लाख कुटुंबे या योजनेच्या कक्षेत असून, जवळपास ५० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होईल असे सांगण्यात आले आहे. या अंतर्गत दिड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु होणार आहे. तर लाभार्थींना ५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षणही मिळणार आहे. कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी, लिवरचे आजार, डायबेटीस यासह १३०० आजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातही गरिब लोक उपचार घेऊ शकतील.

राज्यातील ८४ लाख कुटुंबांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अद्ययावत माहिती नोंदविण्यात आली आहे. त्यांना बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे. यात सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ९७१ सेवांव्यतिरिक्त सुमारे ४०० आरोग्यसेवा या योजनेंतर्गत कुटुंबांना मोफत मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड करण्यात आलेल्या ४० लाख लोकांना पत्र पाठविण्यात आली आहेत. या पत्रांची आरोग्य मित्रांकडून योग्य ती छाननी होऊन लाभार्थींना योजनेचे लाभ मिळणार आहेत. ही योजना ३० राज्यांतील ४४५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी सुरु करण्यात आली आहे. देशभरातील जवळपास १०,००० सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये २.६५ लाख बेड या योजनेंतर्गत राखीव ठेवण्यात आले आहेत.