अमेरिकेची टीका झुगारून देत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी त्यांच्या देशाने व जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची साथ ज्या प्रकारे हाताळली त्याची प्रशंसा केली आहे. कम्युनिस्ट पक्षाची बाजू देशात भक्कम करण्यासाठी त्यांनी ही प्रशंसा केली.

जिनपिंग यांनी बीजिंगमध्ये ग्रेट हॉल ऑफ पीपल येथे असेंब्ली अधिवेशनात सांगितले की, चीनची  करोना विरोधातील लढाई ही सक्षम होती त्यातून साम्यवादी प्रणालीचे सामर्थ्यच दिसून आले आहे. याशिवाय पारंपरिक चिनी संस्कृतीच्या प्रेरणेतून या साथीचा मुकाबला करण्यात यश आले. त्यातूनच मतैक्य घडवून आर्थिक व इतर साधने या साथीविरोधात लढण्यासाठी उपलब्ध करण्यात आली. लोकांच्या संरक्षणासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते करण्याची आमची तयारी आहे. यावेळी उपस्थितांनी मुखपट्टी वापरून सामाजिक अंतराचे पालन केले होते.

करोना विषाणू गेल्या वर्षी वुहानमध्ये पहिल्यांदा सापडला होता. नंतर त्याची वेळीच माहिती न दिल्याचा आरोप अमेरिका व इतर देशांनी चीनवर केला असून चीनने माहिती लपवल्यानेच करोनाची साथ आटोक्याबाहेर गेल्याचे म्हटले आहे. चीनने त्यावर असे म्हटले होते की, त्यांनी जबाबदारीने ही साथ हाताळली. अमेरिकेने त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली होती. जागतिक आरोग्य संघटना चीन धार्जिणी असून त्यांनी चीनला माहिती लपवण्यात मदत केली असा आरोप अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.