गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची निवड झाली आहे. रविवारचा संपूर्ण दिवस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडींचा ठरला. भाजपाचे सहयोगी पक्ष महाराष्ट्र गोमंतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांबरोबर दिवसभर मुख्यमंत्रिपदासाठी काथ्याकूट सुरु होता. अखेर अपेक्षेप्रमाणे सावंत यांच्या नावावर एकमत झाले.

प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते, असेही सांगितले जाते. प्रमोद सावंत हे गोव्यातील सांखळी मतदार संघाचे भाजपाचे आमदार आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

तत्पूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला. विरोधी पक्षनेता चंद्रकांत कावळेलकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व १४ आमदार राजभवनात गेले आणि सिन्हा यांना निवेदन देत त्यांचा पक्ष विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष असून आम्हाला सरकार बनवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.