माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. दिल्लीमधील आर्मी रुग्णालयात सध्या ते दाखल आहेत. सोमवारी त्यांची ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागणही झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनीच ट्विट करत ही माहिती दिली होती.

प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर सर्जरी करावी लागली. ही सर्जरी यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे.

याआधी प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. “आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे,” असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं होतं.