राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ते नागपूरमध्येही पोहोचले आहेत. आरएसएसचा कार्यक्रम आणि प्रणव मुखर्जी यावरुन राजकीय आणि इतर वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. पण या कार्यक्रमात ते नेमके कोणती भूमिका बजावतील? संघ शिक्षा वर्गाचा समारोप म्हणजे नेमकं काय? प्रणव मुखर्जी तिथे किती वेळ असणार? या वेळात त्यांचा नेमका कार्यक्रम काय असणार असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडले असतील. अशाच काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न…

– संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून सायंकाळी ९.३० पर्यंत प्रणव मुखर्जी संघाच्या मुख्यालयात उपस्थित असतील.

– संघाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार भगवा ध्वज फडकावून म्हणजेच ध्वजारोहण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल.

– यावेळी व्यासपीठावर ४ लोक उपस्थित असतील. त्यामध्ये मोहन भागवत, प्रणव मुखर्जी यांच्याबरोबर संघाच्या २ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल.

– प्रणव मुखर्जी यांना बोलण्यासाठी अर्धा तासाची वेळ देण्यात आली आहे. यामध्ये ते राजकीय मुद्द्यांवर न बोलता राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होईल.

– कार्यक्रमाआधी किंवा नंतर मुखर्जी यांना संघ मुख्यालयाचा परिसर दाखविण्यात येईल. याठिकाणीच संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे स्मृतिमंदिर आहे. त्याला मुखर्जी भेट देणार की नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही.

– बुधवारी रात्री प्रणव मुखर्जी यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासोबत रात्रीचे जेवण केले होते. त्याचप्रमाणे आजही ते उपस्थित वरिष्ठांसोबत रात्रीचे जेवण करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

– अशाप्रकारे संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे पहिले किंवा एकमेव नेते नाहीत. याआधी राष्ट्रपिता महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, सैन्यप्रमुख जनरल करियप्पा हेही संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीले होते. इतकेच नाही तर इंदिरा गांधी यांनीही संघाने दिलेल्या निमंत्रणाचा मान राखत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.