पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडाला कशी मदत केली हे सांगणारा आणि त्याची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ प्रशांत भूषण यांनी पोस्ट केला आहे. पीएम केअर या फंडावर सुरुवातीपासूनच विरोधकांनी टीका केली आहे. आता सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय आहे या व्हिडीओत?

या व्हिडीओत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडाला २.२५ लाख रुपये दिल्याचं म्हटलं आहे. या फोटोच्याच बाजूला मि. बिन या विनोदी पात्राचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत मिस्टर बिन हे स्वतःसाठीच काही मोकळी पाकिटं चिटकवतो. दाराबाहेर जातो आणि लेटर बॉक्सची जागा असते तिथून स्वतःलाच पोस्ट करतो. एक-दोन-तीन अशी स्वतःच चिटकवलेली आणि स्वतःला पाठवलेली पत्रं पाहून आनंदी होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअरला केलेली मदत ही अगदी अशाच प्रकारे आहे असं प्रशांत भूषण यांनी या विनोदी व्हिडीओद्वारे सांगितलं आहे आणि पीएम केअर्सला पंतप्रधानांनी दिलेल्या मदतीची खिल्ली उडवली आहे.

प्रशांत भूषण यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मदत ही कशाप्रकारे आहे याची खिल्ली उडवणाऱ्या या व्हिडीओच्या खाली विविध नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.