‘मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी पटट्यातील राज्यांमध्ये झालेला पराभव भाजपासाठी धोक्याची घंटा नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत’ असं ‘जेडीयू’चे नेता प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या निवडणूक प्रचारात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रशांत किशोर यांनी भाजपा राम मंदिराच्या मुद्द्याशिवायही निवडणूक जिंकू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपा राम मंदिराच्या मुद्द्याशिवायही निवडणूक जिंकू शकते, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने केवळ विकासाचा मुद्दा धरुन ठेवला तरी त्यांना यश मिळेल असं किशोर म्हणालेत.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, ‘आज जरी भाजपा 2014 च्या निवडणुकीवेळी जेवढी ताकदवान होती तेवढी नसली तरी 2004 मध्ये ज्यावेळी ते निवडणूक हारले होते त्यापेक्षा नक्कीच जास्त ताकदवान आहे. 2009 मध्ये काँग्रेसकडून पराभव झाला होता त्यापेक्षाही भाजपाची ताकद आता जास्तच आहे. मी 2014 मध्ये भाजपासोबत जोडला गेलो होतो, त्यावेळी राम मंदिराचा अजेंडा नव्हता तरीही भाजपाने त्यांचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलं आणि विजय मिळवला, त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याशिवायही भाजपा नक्कीच निवडणूक जिंकू शकते’. सप्टेंबर महिन्यात किशोर जेडीयूमध्ये सहभागी झाले होते आणि एकाच महिन्यात त्यांना पक्षाचं उपाध्यपद देण्यात आलं.