केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान बाबरपूर येथे शाहीन बाग संबंधी केलेल्या विधानाचा संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी अप्रत्यक्षरित्या समाचार घेतल्याचे दिसत आहे. किशोर यांनी ट्विट द्वारे शाह यांना टोला लगावला आहे.

८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत ईव्हीएमचे बटन तर प्रेमानेच दाबले जाईल. “जोर का झटका धीरेसे लगना चाहीए” जेणेकरून परस्परांमधील बंधुता व सौहार्द यास धोका निर्माण होणार नाही. असं प्रशांत किशोर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच, ट्विटच्या शेवटी त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व हे शब्द देखील वापरले आहेत.

गृहमंत्री अमित शाह रविवारी बाबरपूर येथे निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना उद्देशून म्हणाले होते की, ईव्हीएमचे बटण एवढ्या जोरात दाबा की, बटण इथं बाबरपुरमध्ये दाबले जाईल व करंट शाहीन बागमध्ये बसेल. तसेच, दिल्लीमध्ये शाहीन बाग नकोय. मतदानाच्या दिवशी कमळाला मतदान करा. त्यामुळे निकालाच्या दिवशी आंदोलक घरी निघून जातील,” असं आवाहन देखील शाह यांनी केलं. सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या नेत्यांनी दिल्लीत दंगली घडवल्या आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम केले असल्याचा आरोपही यावेळी गृहमंत्री शाह यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून प्रशांत किशोर यांनी ट्विटद्वारे त्यांना टोला लगावल्याचे दिसत आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सुरूवीतीपासूनच विरोधाचा सुर आळवला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी ट्विटकरून सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे जाहीर अभिनंदन देखील केले आहे. आता प्रशांत किशोर यांची कंपनी दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीची रणनीती बनवण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे त्यांचा पक्ष संयुक्त जनता दल दिल्लीतील निवडणुकीत भाजपाबरोबर आहे.या अगोदर देखील प्रशांत किशोर व गृहमंत्री अमित शाह यांच्यात सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवरूव शाब्दिक फटकेबाजी रंगलेली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असून रविवारी रॅलीत बोलताना त्यांनी भाजपा सत्तेत आली तर दिल्ली एक जागतिक दर्जाचं शहर बनवू असं आश्वासन दिलं आहे. तसंच आपण जर असं करण्यात अपयशी ठरलो तर लोक माझे कान उपटू शकतात असंही यावेळी ते म्हणाले आहेत.