हवाई उद्योग क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी बोईंगने एफ-१५ या फायटर विमानांच्या कार्यक्रमाची सूत्रे प्रत्युष कुमार या भारतीय व्यक्तीकडे सोपवली आहेत. प्रत्युष कुमार हे बोईंगचे भारतातील प्रमुख आहेत. प्रत्युष कुमार हे एफ-१५ च्या अमेरिकेतील आणि जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. बोईंगचे भारतातील प्रमुख या नात्याने त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या पाच वर्षात बोईंगने भारतात चांगला व्यावसायिक विस्तार केला.

सरकारसोबत कंपनीचे उत्तम संबंध प्रस्थापित केले. प्रत्युष कुमार यांच्या कार्यकाळात बंगळुरुमध्ये नवीन शोध आणि कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी इंजिनिअरिंग आणि टेक्नोलॉजी सेंटर उभारण्यात आले. हैदराबादमध्ये टाटा कंपनीसोबत संयुक्त प्रकल्पातून अपाची या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी डिझाईन तयार करण्याचा कारखाना स्थापन केला. संरक्षण व्यवसायात बोईंगला भारतात स्थापित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. अपाची, चिनूक आणि पी-८आय टेहळणी विमानांच्या विक्रीचे भारताबरोबर महत्वाचे करार केले असे बोईंगने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतातील बोईंगच्या व्यवसाय विस्तारासाठी बोईंगचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मार्क अॅलन यांनी प्रत्युष कुमार यांचे आभार मानले आहेत. बोईंगच्या भारतातील भविष्याबद्दल मी प्रचंड उत्सुक आहे. भारतात पाळंमुळं भक्कम करण्यासाठी आम्ही भारतात मोठया प्रमाणावर गुंतवणूक करत आहोत. तंत्रज्ञान, नवीन शोध आणि उत्पादन विस्तार कायम ठेवणार आहोत. बोईंगने माझा सन्मान केला असून माझ्या नव्या भूमिकेबद्दल मी प्रचंड उत्सुक आहे असे प्रत्युष कुमार म्हणाले.