शरद पवार यांचे आतापर्यंतचे कार्य सलाम करण्यासारखेच असल्याचे उद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये काढले. शरद पवार यांच्या पंच्च्याहत्तरी निमित्त नवी दिल्लीमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आपल्या आठवणींना उजाळा देत सर्वच वक्त्यांनी शरद पवारांच्या आतापर्यंतच्या कामाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, फारुख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, लालूप्रसाद यादव व्यासपीठावर उपस्थित होते. दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमाला देशाच्या राजकीय वर्तुळातील सर्वपक्षीय नेते, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज लोक, माध्यमांमधील ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते.
प्रणव मुखर्जी म्हणाले, गेल्या चार दशकांपासून मी शरद पवारांना ओळखतो. देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात त्यांनी केलेले काम खूप मोठे आहे. यूपीए सरकारच्या काळात आम्ही मंत्रिपद वाटपाबद्दल चर्चा करत असताना त्यांनी स्वतःहून कृषिमंत्रीपद देण्याची मागणी केली. त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटले. पण त्यानंतर मी राष्ट्रपती होईपर्यंतच त्यांनी त्यांचे कृषी क्षेत्रातील काम दाखवून दिले होते. मुंबईतील बॉम्बस्फोट आणि दंगलींनंतर त्यांना केंद्रातून परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुंबईत पाठविण्यात आले. त्यावेळी अवघ्या आठवड्याभराच्या काळात त्यांनी मुंबईतील जनजीवन सुरळीत केले होते. त्यावेळी सलाम मुंबई अशी घोषणा प्रसिद्ध झाली होती. शरद पवारांचे कार्यही सलाम करण्यासारखेच आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ रचनात्मक कामांसाठी दिला आहे. रचनात्मक विकासाचे काम करणे हाच त्यांचा मूळ पिंड आहे. त्यांचे काम बघायचे असेल तर बारामतीला नक्कीच भेट दिली पाहिजे. सतत नवीन विचार करण्यात आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या शरद पवारांनी सहकार आणि राजकारण याचे आपल्या राजकीय वाटचालीत योग्य संतुलन राखले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना पाहिले, त्यावेळीच त्यांच्यातील कुशल प्रशासक मला दिसला होता. अंडरवर्ल्डच्या दहशतीमुळे मुंबईचे सामान्य जनजीवन धोक्यात आले होते. पण मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचविण्याचे काम शरद पवार यांनीच केले. आपल्या कामावरची त्यांची निष्ठा कौतुकास्पद आहे. त्यामध्ये त्यांनी कधी प्रतिमा संवर्धनाचा विचार केला नाही.
सोनिया गांधी म्हणाल्या, गेल्या दोन दशकांपासून मी शरद पवारांना ओळखते. काँग्रेससोबतचे त्यांचे नाते खूप जुने आहे. त्यांच्यासोबत काही मुद्द्यांवर आमचे दुमत झाले असले, तरी दोघांनाही एकमेकांबद्दल आदर आहे. काँग्रेस आणि त्यांच्या पक्षाचा समान तत्त्वांर विश्वास आहे. कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेले काम अतुलनीय आहे. सलग दहा वर्षे कृषिमंत्रीपद सांभाळणारे ते देशातील एकमेव नेते आहेत. या काळात त्यांनी कृषी संशोधनावर भर दिला. त्याचे परिणाम सर्वांना दिसले आहेत.
विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांच्या असलेले संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांचे नेटवर्किंग स्किल्स वाखाणण्याजोगे आहे. शरद पवार यांनी शतक साजरे करावे, अशीच मी त्यांना शुभेच्छा देते.
सत्काराला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, गेली पाच दशके संसदीय जीवनात केलेल्या कामाची पोचपावतीच आज मिळाली आहे. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी विकासकामांनाच प्राधान्य दिले. आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातूनच गरिबी दूर केली जाऊ शकते, असा माझा विश्वास आहे. त्यामाध्यमातूनच सर्वांना सुख-समृद्धी मिळवून दिली जाऊ शकते. संसदीय जीवनात कसे वागावे, याचा वस्तुपाठच मला दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाला. राजकारण सभ्यतेने कसे केले पाहिजे, याचा आदर्श त्यांनीच घालून दिला. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही. सत्तेवरील लोकांच्या चुका या कामकाज सुरू ठेवून त्या माध्यमातूनच सुधारल्या जाऊ शकतात, यावर आमचा विश्वास आहे. माझ्या कृषिमंत्रीपदाच्या काळात आपला देश धान्याचा निर्यात करणारा देश झाला, याबद्दल मला विशेष आनंद आहे.