रोडरोमिओंविरोधात उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी अँटी रोमिओ पथक सुरू केला असतानाच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या पथकावरुन निशाणा साधला आहे. ‘नशीब, माझे लग्न झाले, नाही तर योगी आदित्यनाथांनी माझे लग्नही होऊ दिले नसते’ असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

उत्तरप्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. भररस्त्यात मुली आणि महिलांची छेड काढण्याचे प्रकारही वारंवार समोर येत असतात. या रोडरोमिओंवर लगाम लावण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अँटी रोमिओ पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने रोडरोमिओंवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. मात्र या पथकाकडून काही प्रेमी युगूलांनाही त्रास दिल्याचे समोर आले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथांना चिमटा काढला. अखिलेश म्हणाले, नशीब माझे लग्न आधीच झाले, नाही तर योगी आदित्यनाथांनी माझे लग्नही होऊ दिले नसते. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यांनी प्रेमविवाह केला होता. मैसूरमध्ये इंजिनिअरिंग करत असताना त्यांची डिंपल यांच्याशी ओळख झाली होती. हळूहळू या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर अखिलेश हे पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेले. तिथून परतल्यावर अखिलेश यांनी डिंपल यांच्याशी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र वडील मुलायमसिंह यादव यांनी या लग्नाला नकार दिला होता. डिंपल या राजपूत जातीच्या असल्याने मुलायमसिंह या लग्नाला तयार नव्हते. पण अमरसिंह आणि अन्य काही नेत्यांनी पुढाकार घेत मुलायमसिंह यांना या लग्नाला होकार द्यायला लावला. २५ नोव्हेंबर १९९९ मध्ये अखिलेश आणि डिंपल यादव यांचे लग्न झाले. डिंपल यादव यादेखील आता राजकारणात सक्रीय झाल्या असून विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखिलेश यादव यांच्यासाठी प्रचारही केला होता.