भारतात गांधी परिवाराचे महत्त्व वाढावे म्हणून इतरांनी दिलेले योगदान आणि इतरांचे बलिदान यांचे महत्त्व कमी केले गेले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. देशासाठी ज्यांनी योगदान दिले अशा शामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी आहे, काश्मीरमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. मात्र गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा अनेक सुपुत्रांचे योगदान आणि महत्त्व कमी केले गेले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. तिथे राजगढमध्ये मोहनपुरा धरण योजनेचा लोकार्पण सोहळा झाला, या सोहळ्याच्या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आरोप केला.

कोणीतीही योजना किंवा प्रकल्प हे झपाट्याने होणाऱ्या विकासाचे उदाहरण आहे यात शंकाच नाही. मात्र अशा प्रकल्पांमुळे सरकार कशा प्रकारे काम करते आहे हेदेखील जनतेपर्यंत पोहचते असेही त्यांनी स्पष्ट केले. ४ वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. पाणी पाईपलाईनद्वारे शेतात कसे पोहचू शकेल यावर भर देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या जनसभेत त्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला.

देशातले काही लोक हे फक्त अफवा आणि भ्रम पसरवण्याचे काम करत आहेत. त्या लोकांना वास्तव काय हे माहितच नाही. जनसभेला तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यामुळे तुमचा सगळ्यांचाच केंद्र आणि राज्य सरकारवर किती विश्वास आहे हे स्पष्ट होते. आरोप करणाऱ्यांना काय वाट्टेल ते म्हणू देत त्यांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. देशाचा विकास झाला पाहिजे हे श्यामाप्रसाद मुखर्जींचेही स्वप्न होते. आम्ही त्यांचेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. स्किल इंडिया मिशन, स्टार्ट अप योजना, मेक इन इंडिया हे सगळे देशाच्या विकासाचे महत्त्वाचे टप्पे आहेत असेही मोदींनी सांगितले.

मोहनपुरा येथील प्रकल्पासाठी ३८०० कोटी रुपये लागले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. या धरणाचे काम डिसेंबर २०१४ मध्ये सुरु झाले होते. या धरणाला एकूण १७ दरवाजे आहेत. या धरणामुळे १.३५ लाख हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राजगढ हा दुष्काळग्रस्त भाग आहे इथे शेतकरी पावसावर अवलंबून आहे मात्र या प्रकल्पामुळे त्याची ही समस्या सुटणार आहे असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.