स्वातंत्र लढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच ध्वजारोहन केले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, नेताजींचा एकच हेतू होता एकच मिशन होते ते म्हणजे देशाचे स्वांतत्र्य. हीच त्यांची विचारधारा होती आणि हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. भारताने आजवर अनेक क्षेत्रात प्रगती केली असली तरी अद्याप नव्या उंचीवर पोहोचणे बाकी आहे. हेच लक्ष गाठण्यासाठी भारताचे आज १३० कोटी लोक नव्या भारताचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत. ज्या भारताची कल्पना सुभाष बाबूंनी केली होती.

केंब्रिज विद्यापीठातील आपल्या आठवणींवर सुभाष बाबूंनी लिहीले होते की, आपल्याला नेहमी हे शिकवले जाते की, युरोप ग्रेट ब्रिटनचाच मोठा  भाग आहे. त्यामुळे आपल्याला युरोपकडे इंग्लंडच्या चष्म्यातूनच पहायची सवय लागली आहे. आज मला सांगावासं वाटतंय की, स्वतंत्र भारताला जर सुभाष बाबू आणि सरदार पटेलांसारख्या लोकांचे मार्गदर्शन मिळाले असते तर भारताला पाहण्यासाठी विदेशी चष्म्याची गरज पडली नसती.

लाखो जणांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वराज प्राप्त झालं आहे. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की हे स्वराज आपण सुराज्याद्वारे जपले पाहिजे. गेल्या ४ वर्षांत देशाचे संरक्षण खातं मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. संरक्षण क्षेत्रात चांगले तंत्रज्ञान आणले. या सरकारनं देशात मोठे आणि कठोर निर्णय घेतले आणि अद्यापही घेतले जात आहेत. यामध्ये सर्जिकल स्ट्राइक किंवा नेताजींच्या मृत्यूसंबंधीची कागदपत्रे सार्वजनिक करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश असल्याचे मोदी यावेळी बोलताना म्हणाले.