पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(सोमवार) सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. मोदी आज नेमकं काय सांगणार, याबाबत देशवासियांना उत्सुकता लागली आहे.पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून संबोधन करणार असल्याचे समजल्यावर नागरिकांना त्याबाबत कमालीची उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर आजच्या संबोधनाबाबत देखील विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

यामध्ये देशातील करोनाची स्थिती, म्युकरमायोकोसिसचा धोका, देशभरातील लसीकरण मोहीम, शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आदी प्रमुख मुद्यांवर मोदी बोलू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.

याशिवाय, केंद्र सरकारकडून पहिल्या लाटेप्रमाणेच आता करोनाच्या दुसऱ्या लाटेत काही विशेष क्षेत्रांसाठी पॅकेज घोषित केलं जाऊ शकतं का? असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. तसेच, आता देशातील अनेक मोठी शहरं अनलॉक होत असल्याने, या पार्श्वभूमीवर जनतेला दक्षता बाळगण्या संदर्भातही मोदी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोदींकडून शास्त्रज्ञांचे कौतुक

दरम्यान, कोविड-१९ ची मेड इन इंडिया लस तयार केल्याबद्दल आणि करोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा प्रतिकार करण्यासाठी केवळ एका वर्षातच अन्य उपाययोजनांना चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केलं होतं.