आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेल्या पी. चिदम्बरम यांच्या पाठिंशी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उभ्या राहिल्या आहेत. चिदम्बरम यांनी प्रामाणिकपणे देशसेवा केली आहे. त्यांनी न अडखळता या सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर सूड उगवला जात आहे. मात्र आम्ही लढा देत राहू, असे ट्विट प्रियंका यांनी केले आहे.

आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून सीबीआय आणि ईडीचे पथक त्यांना अटक करण्यासाठी घरी गेले होते. मात्र, जामीन नाकारल्यापासून चिदम्बरम भूमिगत झाले झाल्याने पथकांना तसेच परतावे लागले होते. आता चिदम्बरम यांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, बुधवारी सकाळीही सीबीआयचे चिदम्बरम यांच्या घरी गेले होते. मात्र, ते सापडले नाहीत.

चिदम्बरम यांच्यामागे सीबीआय आणि ईडीचा ससेमिरा लागलेला असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी त्यांच्यासाठी धावून आल्या आहेत. उच्च विद्याविभूषित आणि राज्यसभेचे सदस्य असलेल्या पी. चिदम्बरम यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री पदासह अनेक दशकांपासून देशाची सेवा केली आहे. सध्या कोणतीही भीती न बाळगता ते सध्याच्या सरकारचे अपयश जनतेसमोर मांडत आहेत. हेच सत्य डोकेदुखी ठरत असल्याने त्यांना त्रास दिला जात आहे. सूड उगवत आहेत. मात्र आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत. निकाल काही येणार असला तरी आम्ही निरंतर लढा देत राहू, असे प्रियंका यांनी ट्विट केले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर काँग्रेसमधील तीन ज्येष्ठ वकील चिदम्बरम यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत. अभिषेक सिंघवी, कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शीद हे तिघेही त्यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी युक्तिवाद करणार आहेत. आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणी चिदम्बरम यांना चौकशीसाठी बजावण्यात आलेल्या समन्सला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते चौकशीला हजर राहतात. त्यामुळे अटक करण्याचे कोणतेही कारण नाही, असा युक्तिवाद करणार आहे.