केंद्र, रिझव्‍‌र्ह बँकेला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

अंध व्यक्तींना सरकारने नव्याने चलनात आणलेल्या नोटा व नाणी वापरण्यात अडचणी येत असून, त्या बाबत दिल्ली उच्च न्यायालयाने सरकार व रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया यांना नोटीस जारी केली आहे. न्यायालयाने सांगितले, की ही अतिशय गंभीर अशी लोकहिताची बाब असून, नोटांचा आकार बदलल्याने अंधांना त्या हाताळण्यात अडचणी येत आहेत.

हंगामी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्या. सी. हरी शंकर यांनी सांगितले, की आम्ही या नोटांबाबतची समस्या विचारात घेतली असून नवीन नोटा बदलून अंधांना दोन नोटांमधील फरक कळेल अशा पद्धतीने कराव्यात, त्याबाबत सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेला नोटीस जारी करण्यात येत आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे. आताच्या सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेचे वकील संजीव नरुला यांनी सांगितले, की ही याचिका निवेदनात्मक असून निकाली काढण्यात यावी. न्यायालयाने सांगितले, की आताच्या टप्प्यात ती निकाली काढता येणार नाही. अखिल भारतीय अंध महासंघाने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे, की नवीन नोटा हाताळण्यात अंध व्यक्तींना अडचणी येत आहेत. १० रुपये, ५ रुपये, २ रुपये व १ रुपया यांची रचना सारखीच असल्याने त्यांच्यातील फरक ओळखता येत नाही, त्यामुळे त्यातही बदल करण्यात यावा. नोटांच्या वापराबरोबर त्यातील ओळखीच्या खुणा या नष्ट होत जातात, असा नव्या नोटांबाबतचा अनुभव आहे. त्यामुळे नवीन चलनी नोटा टप्प्याटप्प्याने बदलण्यात याव्यात, कारण अंध लोकांना रोजचे व्यवहार करणे कठीण झाले आहे.