उच्च न्यायालयात फेब्रुवारीत सुनावणी

तीस हजारी न्यायालयाच्या संकुलात २ नोव्हेंबर रोजी पोलीस आणि वकील यांच्यात झालेल्या चकमकीनंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी निदर्शने करून धरणे धरले त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी घेण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने याचिकेवरील सुनावणीसाठी फेब्रुवारीपूर्वीची तारीख देण्यास नकार दिला. पोलिसांबरोबरचा संघर्ष सोडविण्यासाठी वकिलांनी चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न करण्याची सूचनाही पीठाने केली आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही समाज माध्यमांवर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी निवेदने दिली त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यापूर्वी या याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी मागणी अर्जदारांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. तेव्हा याबाबत नंतर निर्णय घेऊ असे न्यायालयाने सांगितले. वकिलांनी सर्व चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांसमवेतचा संघर्ष मिटवावा, त्यामुळे सुनावणीची दूरची तारीख गरजेची आहे, असे पीठाने स्पष्ट केले.

वकिलांना हिंसाचार थांबविण्याची विनंती करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची ध्वनिचित्रफित

नवी दिल्ली : तीस हजारी न्यायालयाच्या संकुलात पोलीस आणि वकील यांच्यात संघर्ष झाल्यानंतर शुक्रवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला अधिकारी वकिलांच्या गटाला हिंसाचार न करण्याची विनंती करीत असल्याचे दिसत आहे. पुरुषांचा एक हिंसक गट याच महिला अधिकाऱ्यावर हल्ला करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शुक्रवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला अधिकारी हात जोडून वकिलांना विनंती करीत असल्याचे दिसत आहे, तर त्यांच्या पथकातील पोलीस स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. तर वकील या महिला अधिकाऱ्याला व पथकाला ढकलत असल्याचे दिसत आहे. तर मागे वाहने जळताना दिसत आहेत. राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली महिला आयोगाने ज्येष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.