कैलास-मानससरोवर यात्रेला जाण्यासाठी सिक्कीममधील नथुला खिंडीतून पर्यायी मार्ग देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबर करार केल्याने उत्तराखंडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यात्रेशी संबंधित स्थानिक व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन केले.
कैलास-मानससरोवर यात्रेचा पारंपरिक मार्ग उत्तराखंडमधील पिथोरागड येथून जातो. दरवर्षी हजारो यात्रेकरू या मार्गाने तिबेटमधील कैलास पर्वत आणि त्यालगतच्या मानससरोवरच्या यात्रेसाठी जात असतात. पिथोरागड, लिपुलेख या मार्गाने हा प्रवास होतो. हा भाग कुमाऊँ परिसरात येतो. या यात्रेमुळे कुमाऊँमधील पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळते. परंतु सुदूर सिक्कीममधील नथुला येथून पर्यायी मार्ग सुरू करण्याबाबत करार झाल्यानंतर उत्तराखंडमधील मार्गाचे महत्त्व कमी होईल, अशी भीती या यात्रामार्गावर व्यवसाय करणाऱ्यांना वाटते आहे. कुमाऊँ परिसरातील पर्यटन व्यवसाय संपवण्याचे हे षड्यंत्र आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही याचा तीव्र निषेध केला आहे.