17 December 2017

News Flash

लाच रकमेचीही तरतूद!

आपलीच हेलिकॉप्टर्स भारताने खरेदी करावीत या अट्टहासापोटी ऑगस्टावेस्टलॅण्डने या व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना लाच देण्यासाठी

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: February 15, 2013 5:10 AM

* हेलिकॉप्टर्स विक्रीसाठी ऑगस्टावेस्टलॅण्डची शक्कल
* कंत्राट मंजूर करण्यासाठी २१७ कोटी रुपयांची खिरापत

आपलीच हेलिकॉप्टर्स भारताने खरेदी करावीत या अट्टहासापोटी ऑगस्टावेस्टलॅण्डने या व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना लाच देण्यासाठी तब्बल २१७ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली होती. विशेष म्हणजे हा घोटाळा उघडकीस येईपर्यंत ही लाचेची देवाणघेवाण सुरू होती. तसेच हेलिकॉप्टर विक्रीचे कंत्राट याच कंपनीला मिळावेत यासाठी भारतीय दलालांनीही त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक तसे बदलही करून घेतले.
इटली सरकारच्या मालकीची असलेली ऑगस्टावेस्टलॅण्ड आणि फिनमेक्कानिका या दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे ब्रुनो स्पॅग्नोलिनी आणि जोजफ ओर्सी यांनी या व्यवहाराच्या आर्थिक अंदाजपत्रकात साडेसात टक्के रक्कम लाचेपोटी लागणार म्हणून बाजूला काढून ठेवली होती. बारा हेलिकॉप्टरच्या खरेदीचा हा व्यवहार एकंदर ३६०० कोटींचा होता. त्यातील २१७ कोटी रुपये लाचेपोटी देण्यात आल्याचे चौकशीत आढळले आहे. अटकेत असलेल्या या दोन्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यातर्फे त्यांचे तीन चुलत बंधू या व्यवहारात दलाली करत असल्याचेही या चौकशीत पुढे आले आहे.
हेलिकॉप्टर विक्रीच्या या व्यवहारात अनेकजण दलाली करत होते. त्यात ऑगस्टावेस्टलॅण्ड आणि फिनमेक्कानिका यांच्यातर्फे ग्युडो हॅश आणि कालरे गेरोसा यांना चार लाख युरो देण्यात आले. या दोघांनी त्यातील एक लाख युरो (७२ लाख रुपये) त्यागींचे तीन चुलत बंधू ज्यूली, डोक्सा आणि संदीप यांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
नियमांमध्ये बदल
ऑगस्टावेस्टलॅण्डकडून देण्यात येत असलेल्या पैशांमुळे हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील नियमांमध्येही वेळोवेळी बदल करण्यात येत होते. टेंडर स्पर्धेत ऑगस्टावेस्टलॅण्डच कशी टिकेल याचीही खबरदारी घेण्यात येत होती. रशिया व अमेरिकी कंपन्यांना मागे टाकून तीन इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचे अंतिमत ठरले, जे की ऑगस्टावेस्टलॅण्डच्या पथ्यावर पडले. या संपूर्ण घडामोडींची माहिती तत्कालीन हवाई दल प्रमुख त्यागी यांच्याकडून आपल्याला देण्यात येत होती असे ‘एडीआर’ या मध्यस्थाने चौकशीत सांगितले असल्याचे समजते.

अलेक्झांड्रो पानसा ‘फिनमेक्कानिका’चे नवे सीईओ
‘फिनमेक्कानिका’ या इटलीतील सर्वात मोठय़ा संरक्षण कंत्राटदार कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अलेक्झांड्रो पानसा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ओरसी यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता पानसा यांची नियुक्ती करण्यात आली.

‘एनडीए राजवटीत निविदांचे निकष बदलले’
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदीत घोटाळा झाल्याबद्दल भाजप केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग हे माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. एनडीएच्या राजवटीत निविदांमधील निकषांचे मापदंड बदलण्यात आले होते, असे जसवंत सिंग यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकरणात इटलीची कंपनीच दोषी असून जनतेला त्याचे विस्मरण झाले आहे, असे जसवंत सिंग म्हणाले. माजी हवाई दल प्रमुखांविरुद्ध अशा प्रकारचे आरोप केले जाऊ नयेत कारण ते हवाई दल आणि देशाच्या दृष्टिकोनातून हिताचे नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असून स्वत: त्यागी यांनीही चौकशी लवकर सुरू व्हावयास हवी, असे मत व्यक्त केले आहे.

बर्लुस्कोनी म्हणतात; लाचखोरी आवश्यक
‘फिनमेक्कानिका’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जोजफ ओर्सी यांच्या बचावासाठी पुढे आलेले इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांनी जागतिक पातळीवर व्यापार करण्यासाठी लाचखोरी हा आवश्यक घटक असल्याचे मत व्यक्त केले आहे. लाचखोरी ही अस्तित्वात असलेली असाधारण बाब असून तिचे आवश्यक असलेले अस्तित्व नाकारणे निर्थक आहे, असे बर्लुस्कोनी यांनी टेलिव्हिजनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे गुन्हा नव्हे. एखाद्या देशातील एखाद्या व्यक्तीला आपण दलाली दिली असे म्हणतो, कारण त्या देशात तसे नियम आहेत, असेही बर्लुस्कोनी यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.

First Published on February 15, 2013 5:10 am

Web Title: provision for bribe amount also